For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक पूर्वतयारीला प्रारंभ

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक पूर्वतयारीला प्रारंभ
Advertisement

डोहा : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकधारक अॅथलिट नीरज चोप्राच्या येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीला प्रारंभ होत आहे. शुक्रवारी येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात नीरज चोप्रा सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 2024 च्या अॅथलेटिक्स हंगामातील डायमंड लिग सिरीज अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहिला टप्पा येथे होत आहे. नीरज चोप्रा हा विद्यमान विश्व आणि आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन आहे. डोहामध्ये होणाऱ्या डायमंड लिग स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात भारतातर्फे नीरज चोप्रा आणि किशोर जेना सहभागी होत आहेत. 26 वर्षीय नीरज चोप्राने भालाफेक या क्रीडा प्रकारात आपले जागतिक वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. नीरज चोप्राला प्रामुख्याने ग्रेनेडाचा माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स तसेच ऑलिम्पिक आणि विश्व स्पर्धेतील पदक विजेता झेकचा जेकूब व्हॅडेलेच हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या किशोर जेनाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहिल. किशोरचे पहिल्यांदाच डायमंड लिग सिरीज अॅथलेटिक्स स्पर्धेत पदार्पण असून त्याची भालाफेक या क्रीडा प्रकारात 87.54 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Advertisement

तर नीरज चोप्राने भालाफेक या प्रकारात 89.94 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शुक्रवारी होणाऱ्या या स्पर्धेत आपण 90 मीटरची मर्यादा ओलांडण्यासाठी प्रयत्न करेन, असे नीरज चोप्राने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या स्पर्धेत जर्मनीचा युरोपियन चॅम्पियन आणि ऑलिम्पिक व विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चौथे स्थान मिळवणारा ज्युलियन वेबर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुरुषांच्या भालाफेक या क्रीडा प्रकारात एकूण 10 स्पर्धक सहभागी होत आहेत. डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेचा दुसरा टप्पा मोरोक्को येथे 19 मे रोजी होणार आहे. नीरजने 2023 च्या अॅथलेटिक्स हंगामात डायमंड लिग स्पर्धेतील डोहाचा पहिला टप्पा जिंकला होता. नीरज यावेळी पुन्हा या स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करेल. 2022 साली नीरज चोप्राने 88.67 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली तर व्हॅडेलेजने 88.63 मीटर तसेच अँडरसन पीटर्सने 85.88 मीटरचे अंतर नोंदवले होते. झेकच्या व्हॅडेलेजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक तर 2023 च्या डायमंड लिग स्पर्धेतील चॅम्पियनशिप मिळवली होती. डोहामध्ये व्हॅडेलेजने 2022 साली भालाफेक या प्रकारात 90.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. 2022 च्या अॅथलेटिक्स हंगामात नीरजने डायमंड लिग सिरीजमधील तीन टप्पे जिंकून या स्पर्धेतील चॅम्पियनचा बहुमान मिळविला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.