नीरज चोप्राला ‘गोल्डन स्पाइक’चे विजेतेपद
वृत्तसंस्था/ ओस्ट्रावा (चेक प्रजासत्ताक)
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने गोल्डन स्पाइक स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले असून उच्च दर्जाच्या स्पर्धेतील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. 20 जून रोजीच्या पॅरिस डायमंड लीग विजयानंतर चोप्रा येथे नऊ जणांच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर आला. त्याने या वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर गोल्ड स्पर्धेत केलेला प्रयत्न 85.29 मीटर असा माफक राहूनही त्याची सरशी झाली.
दक्षिण आफ्रिकेचा डाऊ स्मिथ दुसऱ्या फेरीत 84.12 मीटरचा थ्रो करून दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स 83.63 मीटरच्या पहिल्या प्रयत्नाच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चोप्राने फाऊलने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात 83.45 मीटरचा थ्रो केला. दुसऱ्या फेरीच्या शेवटी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. परंतु त्याने 85.29 मीटरच्या तिसऱ्या फेरीच्या प्रयत्नाच्या जोरावर अव्वल स्थानावर झेप घेतली. शेवटच्या प्रयत्नात फाउल करण्यापूर्वी त्याच्या पुढच्या दोन थ्रोमध्ये त्याने 82.17 मीटर आणि 81.01 मीटरची नोंद केली.
2016 च्या रिओ ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता जर्मन थॉमस रोहलर 79.18 मीटरच्या खराब थ्रोसह सातव्या स्थानावर राहिला. हा 30 वर्षीय खेळाडू गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहे. चोप्राचा जर्मन प्रतिस्पर्धी ज्युलियन वेबरच्या अनुपस्थितीत ओस्ट्रावा येथील स्पर्धा कमकुवत होती आणि दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता असलेला हा भारतीय खेळाडू विजेतेपदाचा भक्कम दावेदार होता. असे असले, तरी हा 27 वर्षीय भारतीय खेळाडू त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसला नाही. त्याचे प्रशिक्षक झेलेझनी त्याच्या जवळ थ्रो क्षेत्रात उपस्थित होते. कारण झेक प्रजासत्ताकचा हा दिग्गज खेळाडू त्याच्या मायदेशात झालेल्या स्पर्धेचा कार्यक्रम संचालक आहे. चोप्रा गोल्डन स्पाइकच्या गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये तंदुऊस्तीच्या समस्यांमुळे सहभागी झाला नव्हता. परंतु त्यंचे प्रशिक्षक झेलेझनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत नऊ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
चोप्राने आतापर्यंत प्रभावी हंगाम अनुभवला आहे. त्याने पॅरिसमध्ये दोन वर्षांत पहिले डायमंड लीग जेतेपद जिंकले, तर मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहावे लागले, तरी 90 मीटरचा अविस्मरणीय टप्पा पार केला. चोप्राला हे नवीन जेतेपद जिंकल्याने आनंद झाला असेल. कारण जागतिक विक्रमधारक झेलेझनी यांची गोल्डन स्पाइक ही त्यांच्या खेळण्याच्या काळात हमखास जेतेपद मिळविण्याची स्पर्धा होती. आता 59 वर्षांच्या झालेल्या या झेक प्रजासत्ताकच्या दिग्गज खेळाडूने 1986 ते 2006 दरम्यान नऊ जेतेपदे जिंकली. त्यापैकी काही त्यांनी 90 मीटरपेक्षा जास्त अंतराच्या थ्रोसह पटकावली.
चोप्राने यापूर्वी ऑस्ट्रावा येथे भाग घेतला होता, परंतु गोल्डन स्पाइकमध्ये तो सहभागी झाला नव्हता. तो 2018 मध्ये आयएएएफ कॉन्टिनेंटल कपमध्ये भाग घेतलेल्या आशिया पॅसिफिक संघाचा भाग होता आणि 80.24 मीटर थ्रोसह सहाव्या स्थानावर राहिला होता. चोप्राची पुढील स्पर्धा 5 जुलै रोजी बेंगळूरमध्ये होणारी एनसी क्लासिक असेल. पीटर्स आणि रोहलर देखील बेंगळूरमध्ये स्पर्धा करतील.