For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज चोप्रा...नव्वदच्या पार !

10:53 AM May 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
नीरज चोप्रा   नव्वदच्या पार
Advertisement

टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाची पॅरिसमध्ये पुनरावृत्ती करू पाहणारा भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राला तिथं धक्का दिला होता तो पाकिस्तानच्या नदीमनं. त्याच सुमारास त्याला ग्रासलं होतं ते दुखापतीनं...मात्र आता तो पूर्ण तंदुरुस्त झाला असून बऱ्याच काळापासून हुलकावणी देणारं 90 मीटर्सच्या पार भालाफेकीचं उद्दिष्टही त्यानं दोहामध्ये गाठून दाखविलंय...टोकियो ऑलिम्पिकनंतर सातत्यानं वाट्याला येत राहिलेल्या दुसऱ्या स्थानाच्या पल्याड नीरजला अजून जाता आलेलं नसलं, तरी यापुढं बरीच मोठी झेप घेण्याची ताकद त्यानं दाखवून दिलीय...

Advertisement

‘त्याला’ इतरांपासून वेगळं ठरविलंय ते ‘त्याच्या’ अंगातील वैशिष्ट्यापूर्ण गुणांनी...‘त्याची’ वागण्याची सरळ-साधी पद्धत, खिलाडूवृत्ती आणि आनंदी स्वभाव यांनी मोहिनी टाकलीय ती सर्वांवरच. ‘त्याला’ भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वांत श्रेष्ठ अॅथलीट म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये...‘त्यानं’ ऑलिम्पिक, जागतिक नि आशियाई, राष्ट्रकुल अन् डायमंड लीग अशा प्रत्येक स्पर्धेतील सुवर्णपदक खिशात टाकलंय व आता ‘त्यानं’ सतत हुलकावणी देणारा 90 मीटर्सचा टप्पादेखील ओलांडलाय...भारताचा महान भालाफेकपटू नीरज चोप्रा...ध्येयासक्ती, एकाग्रता अन् तुफानी कष्ट यांचा मिलाफ...

नीरजला साऱ्या विश्वात प्रसिद्ध केलं ते 2021 सालच्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानं. परंतु त्यानंतरही त्याला सातत्यानं शक्य होत नव्हतं ते 90 मीटर्सना गवसणी घालणं. हे सारं चित्र बदललंय ते दोहातील डायमंड लीगमध्ये. नीरज चोप्राला सुवर्णपदक जिंकणं शक्य झालेलं नसलं, तरी तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर्स अंतरावर भाला फेकून त्यानं डोक्यावरील फार मोठ्या दबावाला दूर करण्यात यश मिळविलंय...‘रस्ता मिल गया है नब्बे मीटरका...ही माझी सुरुवात असून येऊ घातलेल्या स्पर्धांत मी जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा प्रयत्न करेन. सध्या माझं सारं लक्ष केंद्रीत झालंय ते टोकियो इथं 13 ते 21 सप्टेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या जागतिक स्पर्धेवर. मी पुढं जाण्यास सज्ज आहे. अॅथलेटिक्सच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झालीय आणि मला जास्तीत जास्त दूर पोहोचायचंय’, दोहात स्पर्धा संपल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नीरजनं वापरलेले शब्द...

Advertisement

नीरज सध्या अतिशय तंदुरुस्त व चपळ वाटतोय. त्याच्या मते, शरीर सकारात्मक ऊर्जेनं भरलंय व पॅरिस ऑलिम्पिकपासून सातत्यानं छळणारी मांडीची दुखापत त्याला त्रास देत नाहीये. त्याला त्याच्या ‘फॉलो थ्रू’मध्ये गती आलीय असं वाटतंय अन् 90 मीटर्सची रेषा ओलांडण्याची कामगिरी करणं शक्य झालंय ते त्यामुळंच...ऑगस्ट, 2023 मध्ये हंगेरीत बुडापेस्ट इथं आयोजित केलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजनं पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं, ‘थ्रोअर्सना कुठल्याही ‘फिनिशिंग लाइन’ची चिंता करण्याची गरज नसते’. त्यावेळी त्यानं नोंद केली होती ती 88.17 मीटर्सची. मात्र ऑलिम्पिकनंतर विश्व स्पर्धा जिंकणाऱ्या नीरज चोप्राला 90 मीटर्सचा टप्पा ओलांडणं केव्हा शक्य होईल, असा प्रश्न भारतीयांना सतत छळत होता...

त्याचं उत्तर आता सर्वांना दोहात मिळालंय...दुखापतीनं ग्रस्त नीरजला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनपेक्षितरीत्या धक्का दिला तो त्यावेळी फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं...आता प्रत्येकाला सतावणारा प्रश्न म्हणजे येऊ घातलेल्या भविष्यात नीरज काय करामत करून दाखवेल...दोहातल्या डायमंड लीगपूर्वी हरयाणाच्या पानिपत येथील या 27 वर्षीय अॅथलीटनं 3 जून, 2022 या दिवशी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदविली होती ती स्टॉकहोम येथील डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर्सपर्यंत भालाफेक करून...नीरज चोप्रा गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं 90 मीटर्सचं अंतर पार करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अवघ्या सहा सेंटिमीटर्सची भर घालणं त्याला जमत नव्हतं. दोहात त्यानं तब्बल 29 सेंटिमीटर्सची जोड आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीला दिली. तरीही नीरजच्या उत्साहावर थोडंफार पाणी टाकलं ते 91.06 मीटर्सची नोंद करणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं...

नीरजचा कारकिर्दीतील सर्वांत मोठा निर्णय म्हणजे जागतिक विक्रमाचे मानकरी आणि झेक प्रजासत्ताकचे महान प्रशिक्षक जॅन झेलेझ्नी यांना आपल्या दिशेनं खेचणं...मग गुरूनं शिष्याचा अगदी व्यवस्थित अभ्यास केला अन् त्यांना कळलं की, चोप्राचा भाला ट्रॅकपासून आवश्यक उंचीवरून प्रवास करत नाहीये. खेरीज महत्त्वाच्या तांत्रिक चुका देखील त्यांच्या नजरेस आल्या. खुद्द नीरज सुद्धा त्याच्यात त्या त्रुटी असल्याचं मान्य करतोय. ‘मी सध्या तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रीत केलंय आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय. पण ती सोपी गोष्ट नाहीये’, तो म्हणतो...

90 मीटर्सचा टप्पा गाठून देखील विश्वातील फक्त दोन भालाफेकपटूंना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. 1991 साली कतारचा किमो किन्नूनेन नि आता भारताचा नीरज चोप्रा (टोकियो ऑलिम्पिकनंतर त्याला प्रत्येक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलंय). दोहात अंतिम फेरीत पोहोचलेल्या 11 भालाफेकपटूंपैकी पाच जणांनी ओलांडला होता तो 90 चा आकडा...नीरजनं भारतीयांच्या आशा प्रचंड वाढविलेल्या असून आता प्रत्येक स्पर्धेत त्याच्याकडून अपेक्षा धरल्या जाणार त्या 90 मीटर्सचं अंतर पार करण्याच्या!

प्रतिष्ठेचा ‘90 मीटर्स क्लब’...

दोहामध्ये नीरज चोप्रा हा 90 मीटर्सचं अंतर पार करणारा इतिहासातील 25 वा भालाफेकपटू ठरला. त्यानंतर थोड्याच वेळानं या गटात समाविष्ट होणारा 26 वा अॅथलीट बनला तो जर्मनीचा ज्युलियन वेबर... पुऊषांच्या गटातील 800 ग्रॅम वजनाचा भाला 90 मीटर्सपेक्षा जास्त अंतरावर एकूण 129 वेळा 26 वेगवेगळ्या खेळाडूंनी फेकलाय. त्यात 34 वेळा भीमपराक्रम केलाय तो एकट्या झेक रिपब्लिकचे दिग्गज जॅन झेलेझ्नी यांनी.  त्यातील एक फेक 98.48 मीटरची. हा सध्याचा जागतिक विक्रम. त्याची नोंद मे, 1996 मध्ये जर्मनीतील जेना येथे झाली. हा विक्रम मोडणं आजवर कुणालाही जमलेलं नाहेये...

या यादीत तीन आशियाई खेळाडूंचा समावेश असून पाकिस्तानचा नदीम (92.97 मीटर्स) व चिनी तैपेईचा चाओ सुन चेंग (91.36 मीटर्स) हे त्यातील अन्य दोन भालाफेकपटू...90 मीटरचा अडथळा ओलांडण्याच्या बाबतीत दोहा हे एक लोकप्रिय ठिकाण राहिलंय. कतारच्या या राजधानीतील सुहेम बिन हमाद स्टेडियमवर या गटातील थॉमस रोहलर, अँडरसन पीटर्स, जाकुब वडलेच आणि आता चोप्रा नि वेबर - या पाच जणांनी त्यांची सर्वोत्तम भालाफेक केलीय. फिनलंडमधील कुओर्ताने या ठिकाणनंही पाच वेगवेगळ्या खेळाडूंना 90 मीटरच्या पार जाताना पाहिलंय...

या यादीतील झेलेझ्नीच्या व्यतिरिक्त दुसरं लक्षणीय नाव म्हणजे जर्मनीचा जोहान्स व्हेटर. 97.76 मीटरची भालाफेक करत तो जागतिक विक्रम मोडीत काढण्याच्या जवळ पोहोचला होता...या गटात जर्मनीचं वर्चस्व दिसून येतं अन् तिथं झळकतात त्या देशाचे 7 भालाफेकपटू. त्यांच्या पाठोपाठ भालाफेकीची राजधानी फिनलंड, तर त्यानंतर झेक प्रजासत्ताकचा (2 खेळाडू) क्रमांक...या विभागात एकूण 16 देशांचा अंतर्भाव असून नीरज चोप्रामुळं भारताला तिथं सन्मानपूर्वक जागा मिळालीय

Advertisement
Tags :

.