नीरज चोप्रा 2024 चा सर्वोत्कृष्ट पुरुष भालाफेकपटू
प्रसिद्ध अमेरिकन नियतकालिक ‘ट्रॅक अँड फिल्ड न्यूज’च्या क्रमवारीत अव्वल स्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा याला जागतिक स्तरावरील प्रसिद्ध अमेरिकन नियतकालिक ‘ट्रॅक अँड फील्ड न्यूज’द्वारे 2024 मधील जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष भालाफेकपटू म्हणून घोषित केले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ऑ लिम्पिक सुवर्णपदक हुकून पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून 27 वर्षीय चोप्राला पराभूत व्हावे लागले होते. त्याने कॅलिफोर्नियास्थित मासिकाने प्रकाशित केलेल्या 2024 च्या क्रमवारीत दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. नदीम पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. कारण त्याने 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळांव्यतिरिक्त केवळ एका स्पर्धेत भाग घेतला. ऑलिम्पिकमध्ये त्याने चोप्राच्या 89.45 मीटरच्या तुलनेत 92.97 मीटरची भालाफेक केली होती. पॅरिस डायमंड लीगमध्ये तो चौथ्या स्थानावर राहिला.
1948 मध्ये स्थापन झालेले व स्वत:ला ‘दि बायबल ऑफ दि स्पोर्ट’ म्हणविणारे हे मासिक दरवर्षी जागतिक आणि अमेरिकन क्रमवारी प्रकाशित करते. जागतिक ट्रॅक आणि फील्ड क्षेत्रात या मासिकाला खूप प्रतिष्ठा आहे. चोप्रा 2023 च्या पुऊषांच्या भालाफेकपटूंच्या क्रमवारीत देखील अव्वल क्रमांकावर राहिला होता. 2024 मध्ये नीरजला एकही डायमंड लीग स्पर्धा जिंकता आली नाही. दोहा, लॉसने आणि ब्रसेल्समध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले. गतवर्षी त्याचा एकमेव मोठा विजय हा फिनलंडमधील तुर्कू येथील पावो नूरमी गेम्समध्ये नोंदला गेला.
‘डायमंड लीगमध्ये चोप्राने एकही विजय मिळवला नाही, परंतु पीटर्सपेक्षा तो 3-2 अशा कमी फरकाने पुढे राहिला’, असे सदर मासिकाने नमूद केले आहे. 27 वर्षीय पीटर्सने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नदीम आणि चोप्रा यांच्या मागे तिसरे स्थान पटकावले होते. त्याने 2024 मध्ये लॉसेन, झुरिच आणि ब्रुसेल्स अशा तीन डायंमड लीग स्पर्धा जिंकल्या..