नीना संघाकडे साईराज चषक
के.आर.शेट्टी लायाज उपविजेते, स्वयंम खोत मालिकावीर
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित साईराज चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नीना क्रिकेट अकादमीने के. आर. शेट्टी लायाज संघाचा 87 धावांनी पराभव करुन साईराज चषक पटकाविला. अमीर पठाण सामनावीर, स्वयंम खोत मालिकावीराने गौरविण्यात आले. व्हॅक्सिनडेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात नीना क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 162 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 3 षटकार 4 चौकारांसह 58, अमीर पठाणने 5 चौकारांसह 35, प़ृष्णा पाटीलने 3 चौकारांसह 15 तर आर्यन तुबाकीने 2 चौकारांसह 10 धावा केल्या. के. आर. शेट्टी लायाजतर्फे स्वयंम खोतने 12 धावांत 2 तर गौरव परीटने 35 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी लायाज अकादमीचा 14.4 षटकात 75 धावांत आटोपला. त्यात स्वयंम खोतने 4 चौकारांसह 32 तर विनायक नेसरीकरने 26 धावा केल्या. नीनातर्फे अमीर पठाणने 12 धावांत 4, कृष्णा पाटीलने 20 धावांत 3, झियान समिउल्लाने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उपमहापौर आनंद चव्हाण, पुरस्कर्ते महेश फगरे, वसंत हेब्बाळकर, दीपक पवार, संदीप पवार, यश पवार, गजानन फगरे, रोहीत फगरे, नासीर पठण, श्रेयश पवचर, सोनल वेर्णेकर, ऐश्वर्या वेर्णेकर, अनवर द्राक्षी, संगम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज अजय लमाणी, उत्कृष्ट गोलंदाज अमीर पठाण, उत्कृष्ट संघ प्रमोद पालेकर अकादमी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिगंनाथ वाली, इम्पॅक्ट खेळाडू दर्श रायकर, तर मालिकावीर स्वयंम खोत यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवेश पाटील, आकाश असलकर, बाबु मुल्ला तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले तर ग्राऊंडस्मन म्हणून प्रभाकर कंग्राळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.