‘आचारी बा’मध्ये नीना गुप्ता
चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित
नीना गुप्ता यांनी पंचायत वेबसीरिजमध्ये मंजू देवी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा नीना गुप्ता या ग्रामीण शैलीत झळकणार आहेत. ‘आचारी बा’ होत त्या ओटीटीवर परतल्या आहेत. नीना गुप्ता यांच्यासोबत या चित्रपटात कबीर बेदी, वत्सल सेठ देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला असून यात एक आई अन् शहरात राहणाऱ्या पुत्र-सुनेची कहाणी आहे. बा या व्यक्तिरेखेला स्वत:ची स्वप्ने, हिंमत आहे आणि लोणच्याच्या मसाल्याचा ढीगभर स्वाद असल्याचे यात दिसून येते.
आचारी बा एक भावनात्मक, परंतु प्रेरणा देणाऱ्या अनोख्या नात्यांची कहाणी आहे. हार्दिक गज्जरच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात जयष्णविबेन अनोपचंद वगाडियाची कहाणी आहे. जिच्या हाताला जादू आहे अशा महिलेची ही कहाणी आहे. ही महिला स्वादिष्ट लोणचे तयार करत असते. आचारी बा या चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओज, हार्दिक गज्जर फिल्म्सा आणि ज्योति देशपांडे, पूनम श्रॉफ आणि पार्थ गज्जर यांनी केली आहे.
एक दशकानंतर बा यांना अखेर त्यांच्या मुलाने मुंबईत बोलाविले, परंतु तेथे पोहोचताच हे बोलावणे परिवारासोबत वेळ घालविण्यासाठी नव्हे तर घर अन् पाळीव श्वानाची देखभाल करण्यासाठी असल्याचे तिला उमगते. मुलगा अन् सून विदेश प्रवासासाठी जात असल्याने श्वानाची देखभाल करण्यासाठी बा ला बोलाविलेले असते. शहराच्या धावपळयुक्त अन् अनोळखी वातावरणात बा स्वत:ला एका खोडकर श्वानसोबत घरात एकट्यात आढळून येतात. याच एकटेपणादरम्यान त्यांचा आचारी बा होण्याचा प्रवास सुरू होतो आणि यात कबीर बेदींची व्यक्तिरेखा त्यांना साथ देत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. हा चित्रपट जियो हॉटस्टारवर पाहता येणार आहे.