नील बॉईज हिंडलगाकडे विराट चषक
एसआरएस उपविजेता, तनिष्क सामनावीर-मालिकावीर
बेळगाव : पॅरिस स्पोर्ट्स क्लब, महाद्वार रोड आयोजित दुसऱ्या विराट चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निल बॉईज-हिंडलगा, एसआरएस हिंदुस्थान संघाचा 8 गड्यांनी पराभव करुन विराट चषक पटकाविला. तनिष्क नाईक याला मालिकावीरासह सायकलचे बक्षीस देण्यात आले. महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी मैदान येथे आयोजित केलेल्या अंतिम सामन्यात पुरस्कर्ते विराट हॉटेलचे संचालक कपिल भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख व नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अंतिम सामन्यात एसआरएस हिंदुस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात केवळ 28 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना निल बॉईज हिंडलगा संघाने 5 षटकात 2 गडी बाद 29 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार राजू सेठ, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, पवन जुवेकर, के. आर. शेट्टी किंगचे संचालक प्रणय शेट्टी, दत्तप्रसाद जांबवलेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या निलबॉईज संघाला 66666 रुपये रोख, आकर्षक चषक तर उपविजेत्या एसआरएस हिंदुस्थान संघाला 44444 रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज चेतन पांगिरे, उत्कृष्ट गोलंदाज नारायण हिंडलगा, उत्कृष्ट गोलंदाज विशाल गोवाडकर-निलबॉईज, सामनावीर व मालिकावीर तनिष्क नाईक हिंडलगा यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पॅरिस स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.