गाईचे पर्यावरणीय, आध्यात्मिक महत्त्व समजून घेण्याची आवश्यकता
अॅड शिवाजी देसाई यांचे प्रतिपादन
वाळपई : भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. भारतीय राज्य घटनेने देखील गी संरक्षणाला खूप मोठे महत्त्व दिले आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने गाईचे पर्यावरणीय आणि अध्यात्मिक महत्त्व समजून घ्यायला हवे असे प्रतिपादन वत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी देसाई यांनी केले. मासिक अमावास्या निमित्त नाणूस सत्तरी येथील गोशाळेत आयोजित केलेल्या सत्संग कार्यक्रमात प्रमुख वत्ते या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. वल्लभ धायमोडकर, ब्रह्मानंद नाईक, कल्पना शहा, कपूराम माली, अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र नाणूस सत्तरी चे अध्यक्ष हनुमंत परब, समीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अॅड शिवाजी देसाई यांचा अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र नाणूस वाळपई सत्तरीच्या वतीने श्री कपूराम माली यांनी शाल आणि श्रीफळ देऊन गौरव केला. तर अॅड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते गोप्रेमी श्री नरसी राम गणेशजी माली, श्री माताजी स्टील डिचोली गोवा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमात गायत्री महायज्ञ, गायत्री चालीसा, गोपूजन, श्रीकृष्ण पूजन, आरती, गोग्रास अर्पण असे कार्यक्रम झाले. सूत्रनिवेदन हनुमंत परब यांनी केले.