For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यावर विचार गरजेचा...

06:42 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
यावर विचार गरजेचा
Advertisement

त्या दिवशी खूप दिवसांनी मैत्रिणीच्या घरी गेले होते. चहा घेत घेत गप्पा सुरू होत्या. एकदम तिचे पतीराज हॉलमधे आले आणि म्हणाले, ‘अगं मिनू, ऑफिसला काळी पँट घालू की निळी? की काल होती तीच वापरू?’ मिनूने एकदा माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडे रागीट कटाक्ष टाकला तरीही गृहस्थ काही हलेनात. शेवटी मिनू म्हणाली, ‘मी सांगितले नाही तर ऑफिसमध्ये जाणार नाही का? काळी पँट घाला.’ ‘बरं’ म्हणून निमूटपणे ते आत निघून गेले.

Advertisement

मिनू माझ्याकडे पाहून म्हणाली, ‘हे असं आहे बघ. कसला निर्णय घेता येत नाही यांना. पण एवढा निर्णय तरी यांचा यांना घ्यायला यायला नको का?’ मी हं..खरं आहे तुझं असं म्हणत विषय बदलला आणि थोड्या वेळात माझ्या कामाला बाहेर पडले.

मिनूच्या मिस्टरांसारखी अनेक माणसे समोर येतात. खरंतर प्रत्येक माणसाला रोजच्या जीवनात लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात. परंतु बारीक सारीक निर्णयातही जर दुसऱ्याची मदत घ्यावी लागली तर सारे अवघड होऊन बसते.

Advertisement

आंघोळ आता करू की नंतर? काळी पँट घालू की निळी? काठापदराची साडी नेसू की पंजाबी डेसच घालू, आधी पोळी खाऊ की भात? भाजी कोणती करू? इथपासून ते दोन स्थळातील कोणाला हो वा नाही म्हणू? इंजिनिअरिंगला जाऊ की मेडिकलला असे रोजच्या जीवनातील वा भविष्यातील असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभे असतात. ज्यांच्याकडे चटकन् निर्णय घेण्याची क्षमता असते ते उत्तराच्या दिशेने वाटचाल करू लागतात तर ज्यांना निर्णय घेणे जमत नाही त्यांच्या बाबतीत साधे साधे प्रश्नही यक्षप्रश्न म्हणून समोर उभे ठाकतात आणि समस्या निर्माण करतात.

असे का बरे व्हावे? याचे उत्तर निर्णयक्षमतेचा अभाव वा कमी निर्णयक्षमता असण्यात सापडते. अनेक माणसे निर्णय या शब्दाच्या मागे न पडता एखाद्या मागून फरफटत आयुष्य रेटताना दिसतात. दिसताना ‘निर्णय’ हा शब्द तीन अक्षरी दिसतो खरा परंतु आयुष्य घडविण्याला वा बिघडविण्याला हा शब्द जबाबदार ठरू शकतो. समस्येच्या समाधानासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी एकाची निश्चितपणे निवड करणे म्हणजे निर्णय घेणे. निवडलेल्या मार्गाने जाण्यासाठी लागणारी तयारी करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे या दोन्ही अर्थांनी निर्णय घेणे हा शब्दप्रयोग वापरला जातो.

निर्णयक्षमता हा बुद्धीच्या अनेक पैलुंमधील जसा महत्त्वाचा पैलू आहे तसा तो व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा घटक आहे. निर्णयशक्तीला काही व्यवसायांमध्ये ठायी ठायी आव्हान मिळत असते, वादळवाऱ्यामध्ये जहाजाला बुडण्यापासून वाचविणारा पॅप्टन, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान सुखरूपपणे उतरवणारा वैमानिक, तातडीने ऑपरेशन करण्याचे निर्णय घेणारे डॉक्टर, दूरगामी परिणाम होऊ शकतील अशा खटल्याबाबत निर्णय घेणारे न्यायाधीश, पोलीसखाते, शास्त्रज्ञ..या सर्वांची निर्णयक्षमता उत्तम असणे आवश्यक असते कारण त्यांच्या एखाद्या लहानशा चुकीमुळे आपत्तीला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या गोष्टीची अपेक्षित फलनिष्पत्ती होण्याच्या दृष्टीने सारासार विचार करून योग्य ती अभिव्यक्ती निवडण्याची क्षमता म्हणजे निर्णयशक्ती!

व्यक्तिगत पातळीवर निर्णयक्षमता वाढविण्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवणे हितावह आहे. प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवातून, यश अपयशातून काहीतरी नवीन शिकत असतो. ते शिकताना आधीच्या चुका दुऊस्त करत असतो. हे करताना त्या व्यक्तीची निर्णय शक्ती आकार घेत असते ती प्रगल्भ होण्यासाठी स्वअध्ययन वृत्ती गरजेची आहे. परंतु मुळातच निर्णयाचे बाळकडू मुलांना आपल्या पालकांमार्फत खरोखरच किती मिळते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत ‘हे असं कर,’ ‘हे तसंच कर’ ही सूचना सतत करत राहणाऱ्या पालकांचा स्वभाव मुलांची निर्णयक्षमता विकसित होण्याला अडसर ठरू शकतो किंवा माझ्या मुलाला अगदी कशाकशाची झळ लागू नये म्हणून खूप जपणारे पालकही याच दिशेने वाटचाल करतात. मुलांचे काही निर्णय चुकतील, धडपडतील पण त्यातूनच ती उभी राहतील हे लक्षात घ्यायला हवे. अगदी छोटे छोटे निर्णय घ्यायला मुलांना प्रेरित करणे जर बालपणापासून करता आले तर याच छोट्या छोट्या गोष्टी मोठेपणी उपयुक्त ठरतात. अगदी कठीण प्रसंगातही निर्णय घेताना व्यक्ती डगमगत नाही. स्वत:च्या हिमतीवरती, परिणामांना सामोरे जाण्याच्या तयारीनिशी ती विवेकपूर्ण निर्णयाप्रत पोहचू शकते.

प्रत्येक बारीक सारीक गोष्ट पालकांच्या वा इतरांच्या सल्ल्याने करण्याची सवय असणारी मुले स्वतंत्रपणे विचार करण्याचे धाडसदेखील करत नाहीत. परिणामी प्रौढपणी अशी मुले आत्मविश्वास नसलेली, धास्तावलेली, न्यूनगंडाने पछाडलेली, जबाबदाऱ्या टाळणारी, सर्वस्वी परावलंबी बनतात. स्वतंत्रपणे निर्णय घ्यायची वेळ आली की गलितगात्र होऊन जातात. अशा व्यक्ती पालक झाल्यावर पालक म्हणून स्वत:च्या मुलांना कसे वाढवत असतील याचा विचार न केलेलाच बरा!

मॅडम, ‘मला गाण्यात करिअर करायचं होतं, पण गाण्याने कुठे पोट भरतं का असं वडिलांनी सतत मनावर बिंबवत अभ्यास एके अभ्यास करायला भाग पाडलं आणि माझं जीवनगाणं पुरतं हरवलं.’

‘मला खरंतर टीव्हीवर मॅच पहायला आवडते. खेळाची खूप आवड आहे पण आईला क्रिकेटचा राग येतो, ती पाहूच देत नाही.’ ‘मला ना गुलाबी रंग फार आवडतो पण तो बाबांना आवडत नसल्याने त्यांनी तो मला कधीच वापरू दिला नाही.’

वरील संभाषणातून काय लक्षात येते पहा. प्रत्येक निर्णयात असं कर तसं कर हे सतत सांगणे जसे हानिकारक तसे आपले निर्णय वा मी म्हणेन तीच पूर्व असे पालक असतील तर या पालकशाहीमुळेही मुलांच्या निर्णयशक्तीचे पंख छाटले जातात हे लक्षात घ्यायला हवे.

मुलांना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची संधी जर आपण दिली तर निर्णयशक्ती वाढून मुले स्वावलंबी बनतील. चूक झाली तरी हरकत नाही, पण लहानसहान निर्णय मुलांचे मुलांनाच घ्यायला लावावेत. परिणामांना ते कसे सामोरे जातात यावर पालकांनी लक्ष ठेवावे, क्वचित त्यांना न दुखावता सूचनाही कराव्यात परंतु बऱ्यावाईट अनुभवातून त्यांना शिकू द्यावे. यातून त्यांची निर्णयशक्ती आकाराला येतानाच या अनुभवातून त्यांच्या स्वत:च्या क्षमतांची, मर्यादांची, उणीवांचीही जाणीव व्हायला त्यांना मदत होते.

आजच्या स्पर्धेच्या गतिमान युगात निर्णयक्षमतेचा कस पाहणारे क्षण हरघडी येणार आहेत. विकासाला फुटलेल्या असंख्य वाटा, पर्यायांची वाढती संख्या, जाहिरातींचा भडिमार, माहितीचा महापूर यामुळे कुठच्याही गोष्टीची निवड करणे गुंतागुंतीचे होत जाणार यात शंका नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, मोकळे वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिल्यास निर्णयशक्तीच्या विकासाला चालना मिळेल हे निश्चित!

-अॅड.सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.