For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:साठी थोडा वेळ द्यायला हवा!!

06:32 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वत साठी थोडा वेळ द्यायला हवा
Advertisement

‘समृद्धी. वय साधारण बेचाळीसच्या आसपास. हल्ली सतत कंटाळा आला हे तिचं पालुपद. खरंतर अत्यंत मनमिळावू आणि अॅक्टिव्ह असणाऱ्या समृद्धीला अचानक काय झालं हा प्रश्न संयम म्हणजे समृद्धीच्या नवऱ्याला पडला होता. अलीकडे ती खूप त्रागा करायची. सतत येणारी उद्विग्नता आणि चिडचिड याने मुलेही अस्वस्थ झाली होती. आईला काय झालंय हा प्रश्न मुलांना पडला होता.

Advertisement

समृद्धी मला भेटायला आली त्यावेळी तिची देहबोली, कंटाळा दिसतच होता. तिच्याशी संवाद साधत असताना मी प्रश्न विचारणे आणि तिने त्रोटक उत्तर देणे असेच काहीसे सुरू होते. बोलता बोलता समृद्धी तुला कसली आवड आहे असा प्रश्न विचारला आणि ती पटकन् उत्तरली गाणं फार आवडतं मला. पूर्वी मी खूप गाणी ऐकायची. गायचीसुद्धा.

मी-अरे व्वा..एखादं आवडतं गाणं.

Advertisement

हो आहे ना..मला ना मॅडम नाट्यागीतं फार आवडतात. समृद्धीचा मूड एका क्षणात बदलला. एक वेगळं आश्वासक हसू तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मी म्हटलं मलाही गाणं ऐकायला फार आवडतं.. दोन ओळी म्हणणार का? लहान मूल हसावं तशी ती हसली आणि तिने पटकन् एक कडवं म्हणून दाखवलं. तिचा आवाज खरंच सुंदर होता. गाण्याची समजही चांगली होती. गाणं म्हणून झालं आणि समृद्धीने माझा हात गच्च पकडला.. मॅडम कित्ती वर्षांनी कुणीतरी मला गाणं म्हणायला सांगितलं, माझं कौतुक केलं. ती रडू लागली. थोड्या वेळाने ती शांत झाली. पाण्याचा ग्लास समोर धरला. ठीक आहे समृद्धी.. पाणी घे.

बरं वाटतंय का? हो मॅम. सॉरी. पण खूप असह्य झालं हो.

बरं, आता सांगशील का नेमकं काय झालंय. हो सांगते म्हणत तिने तिचा आजवरचा प्रवास उलगडला.

अतिशय अॅक्टिव्ह आणि मनमिळावू, कला जोपासणाऱ्या समृद्धीला सासर मिळालं ते अगदी विऊद्ध. ती माणसं वाईट होती अशातला भागच नव्हता परंतु ऊटीन पलीकडे काही आयुष्य असतं, छंद, आवडीनिवडी जपायला हव्यात हे त्यांच्या गावीही नव्हतं. वरकरणी चारचौघांसारखा छान दिसणारा संसार सुरू होता. नवरा सासू सासरे, दोन मुलं..चहा, नाष्टा, जेवणं, डबे, ज्येष्ठांचे दुखणे खुपणे, नातेवाईकांची ये-जा, हे सारं सुरू होतं आणि ती ते करतही होती परंतु तोच तोचपणा तिला कंटाळवाणा वाटू लागला होता. गायनाची आवड जोपासायची ठरवली तर तिला कुणी विरोधही केला नसता परंतु कामाच्या रामरगाड्यात आणि संसारचक्रात तिचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आणि थोडी सवड स्वत:साठी काढायला हवी हा विचार बाजूला पडला. आता मात्र कंटाळ्यासोबत, आपल्याला काही गोष्टी करायच्या असूनही आपण त्या केल्या नाहीत हे तिचं तिलाच जाणवत होतं आणि ही खंत चिडचिडीच्या, औदासिन्यतेच्या रूपाने बाहेर येत होती.समृद्धीला काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करण्यासाठी सुचवलं, सजगतेची काही तंत्रेही तिने नियमित येत आत्मसात केली आणि थोड्या कालावधीनंतर हळूहळू तिला जगण्याचा नेमका सूर गवसू लागला.

आपण सर्वच आपापल्या ऊटीनमधे व्यग्र असतो. प्रत्येकाला काम करणे, जबाबदाऱ्या पार पाडणे हे क्रमप्राप्तच आहे. परंतु ह्या कामाव्यतिरिक्त केवळ आवड म्हणून काहीतरी छंद निश्चित जोपासावा. नाहीतर मग हळूहळू आयुष्य नीरस, रूक्ष, कंटाळवाणे होऊ लागते. कुणी आपले कौतुक करावे यासाठी नव्हे तर स्वत:लाच आतून प्रसन्न वाटावे यासाठी छंद जोपासणे आवश्यक आहे, अन्यथा रोजच्या दिनक्रमाचे कंटाळवाणे ओझे वाटायला लागेल. शिकण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत. कुठलाही छंद जोपासावा, वाचन-लेखन करावे, प्राणी पक्षी याबद्दल ज्ञान मिळवावे, जी आवड असेल त्यासाठी थोडा वेळ द्यावा, नवीन एखादी गोष्ट शिकावी. या गोष्टींमुळे वा छंद जोपासनेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वालाही एक वेगळे परिमाणही येते आणि कामाचा ताण दूर होऊन मन रोज थोडा वेळ हलके आणि प्रफुल्लित होते.

आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणे, एवढ्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता न मानता आयुष्य अर्थपूर्ण होणे, थोडे पलीकडचे’ काहीतरी केल्याचे मानसिक समाधान मिळणे हेही महत्त्वाचे आहे. जगाला दाखविण्यासाठी नव्हे वा कुणाची वाहवा मिळविण्यासाठी नव्हे तर केवळ ‘स्वान्त: सुखाय’ आपण वेगळे काहीतरी करणे, छंद जोपासणे, नवे काहीतरी शिकणे या गोष्टींनी आपण समाधान मिळवू शकतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट घरच्या, संसाराच्या जबाबदाऱ्या या न संपणाऱ्या असतात त्यामुळे 365 दिवसातले चार आठ दिवस स्वत:साठी काढले तर त्यामधे अपराधीपण वाटायचे काहीही कारण नाही. कुणीही स्वत:हून तुम्हाला तुझ्यासाठी थोडं जग असे म्हणण्याची वाट पहात रहाल तर सारंच अवघड होईल. स्वत:साठी वेळ हा अवश्य काढायला हवा. तसेच सुऊवातीपासून आपण आपली मूल्ये, धारणा याविषयी सजग असायला हवे. रोज किमान दहा मिनिटे शांत बसून स्वत:च्या मनात डोकावणे, आपले स्वगत तपासणे हेही आवश्यक आहे. रोजच्या जीवनात शारीरिक आरोग्य चांगले रहावे म्हणून आपण व्यायाम, सकस अन्न, शरीराची स्वच्छता याची जशी काळजी घेतो तसेच मनाच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. अनावश्यक विचारांची जळमटे, विघातक भावना, आपल्या धारणा याकडे लक्ष द्यायला हवे. ऊटीन सदैव सुऊच राहते परंतु त्यातून वेळ काढून आपल्या आवडी, छंद हेही जोपासायला हवे एवढे मात्र खरे!!

-अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.