तलावासाठी हवे धोरणात्मक नियोजन
मच्छे गावच्या मुख्य तलावाची स्थिती : झाडे-झुडुपांची साफसफाई करण्याची आवश्यकता : गावात पाण्याची समस्या
वार्ताहर /किणये
यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. पावसाअभावी शेतशिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पाऊस नसल्यामुळे नदी-नाल्यांच्या, तलावांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. यामुळे यावर्षी तालुक्याला पाण्याची समस्या अधिक जाणवणार आहे. याकरिता काही गावांमध्ये असणाऱ्या तलावांसाठी धोरणात्मक नियोजन केले पाहिजे. त्यामुळेच या तलावांमधील पाण्याचा उपयोग होणार आहे. बेळगाव शहरालगत असलेल्या मच्छे गावात सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावात एक मुख्य तलाव आहे. या तलावामध्ये सध्या मध्यम प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र तलावाच्या बाजूने झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. तसेच काहीजण या तलावामध्ये कपडे धुण्याकरिता येत आहेत, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. या तलावाच्या संरक्षणासाठी व योग्य नियोजनासाठी मच्छे नगरपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मच्छे गावात असलेल्या या तलावाचे पाणी पूर्वी छोटा नाला करुन शेतशिवाराला देण्यात येत होते. अलिकडे मात्र तलावाचे पाणी शेतशिवाराला देणे बंद झाले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या तलावाजवळ एक सार्वजणिक विहीर आहे. या विहिरीत तलावाचे पाणी येते. या विहिरीचे पाणी गावाला पिण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे तलावाच्या बाजूला असलेल्या झाडा-झुडुपांची साफसफाई करण्याची गरज आहे, असे गावकरी सांगत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी मच्छे तलावाचे पुनरुजीवन करण्यात आले होते. तलावातील माती काढण्यात आली होती. प्यास फौंडेशन यांनी या तलावाचे पुनरुजीवन केले होते, अशी माहिती गावातील काही माजी ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. तलावाचे पुनरुजीवन केल्यानंतर तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा होऊ लागला आहे. यंदा मात्र पाऊस कमी झाला असल्याने तलावात पाणी कमी आहे. त्यामुळे असलेल्या पाण्याचे व तलावाचे योग्यप्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे.
कमी प्रमाणात पाणीपुरवठा
तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी गावात व हावळ नगर भागाला पुरविण्यात येते. रोज एक तास हे पाणी सोडण्यात येते. मात्र गावची लोकसंख्या पाहता पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गावातील बऱ्याच कूपनलिकांनासुद्धा पाणी नाही. त्यामुळे नागरिकांची अधिक आस या तलावातील पाण्यावर अवलंबून आहे.
आम्ही दाद मागायची कुणाकडे?
तलावाच्या तिन्ही बाजूने झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. त्याची साफसफाई त्वरित करायला हवी. तसेच नागरिकांनी तलावात कपडे धुणे बंद करावे. गावात सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. संभाजीनगर परिसरात दोन वर्षांपासून पाणी येत नाही. पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? तलावातील पाणीसाठा जानेवारीपासून कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पाण्याची टंचाई अधिक निर्माण होणार आहे. मच्छे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या तलावाची पाहणी करुन तलावाच्या संवर्धनासाठी लवकरात लवकर कामकाज सुरू केले पाहिजे. तसेच गावात पिण्याच्या पाण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सचिन बेळगावकर