पुण्यासाठी बेळगावमधून रात्रीच्या रेल्वेची गरज
प्रवाशांमधून मागणी : रात्रीच्या प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा वापर
बेळगाव : पुणे येथे अनेक आयटी कंपन्या तसेच व्यापाराची केंद्रे असल्याने बेळगावमधील नागरिकांची सर्वाधिक ये-जा या शहराला असते. परंतु, रात्रीच्या वेळी बेळगावमधून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांसाठी एकही रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यासाठी रात्री बेळगावमधून निघून सकाळी पुण्याला पोहोचणाऱ्या रेल्वेची मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे. बेळगाव-पुणे या मार्गावरील रेल्वेला सर्वाधिक प्रतिसाद दिसून येतो. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही सर्वाधिक प्रतिसाद बेळगावच्या प्रवाशांचा आहे. परंतु, प्रत्येक प्रवाशाला हजार ते बाराशे रुपये खर्च करून पुण्याला जाणे अशक्य आहे.
प्रवाशांची गैरसोय...
पुणे येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या बेळगावमधून मोठी आहे. सध्या रात्रीची एक्स्प्रेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगाव अथवा हुबळी येथून पुण्याला जाणारी रात्रीची रेल्वे सुरू करावी. यामुळे सर्वसामान्यांना पुण्यापर्यंतचा प्रवास करणे सोयीचे ठरेल.
- प्रसाद कुलकर्णी (रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य)