For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राण्यांपासूनच्या रोगांबाबत जागृतीची गरज

10:35 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्राण्यांपासूनच्या रोगांबाबत जागृतीची गरज
Advertisement

जागतिक प्राणीजन्य रोग प्रतिबंधक दिनविशेष : 200 हून अधिक रोगांचा समावेश,  जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक पाळीव प्राण्यांची संख्या

Advertisement

बेळगाव : प्राण्यापासून मानवाला होणाऱ्या रोगांची जागृती करण्यासाठी 6 जुलै हा ‘झुनोटिक डे’ म्हणजेच जागतिक प्राणीजन्य रोगप्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. प्राण्यापासून मानवाला अनेक संसर्गजन्य रोगांची लागण होते. याबद्दल अलीकडे समाजात जागृती होऊ लागली आहे. त्यामुळे जागतिक रोग नियंत्रण दिनानिमित्त ही सर्वांच्या दृष्टिकोनातून दिलासादायक बाब आहे. मनुष्य हा प्राण्यामध्ये संक्रमित होणाऱ्या 200 हून अधिक आजारांचा समावेश आहे. त्यातील 10 पैकी 6 आजार प्राण्यापासून होतात. जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक पाळीव प्राण्यांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, कुत्रा, शेळ्या, मेंढ्या, गाढव, मांजर, डुक्कर आदींचा समावेश आहे. या प्राण्यांपासून मानवाला विविध संक्रमित होणाऱ्या रोगांचा धोका आहे. यासाठी खबरदारी म्हणून आणि उपाययोजना करून संसर्गापासून दूर राहता येते. त्याबरोबर व्हायरस, बॅक्टेरिया आणि रोगजनकांच्या संपर्कात येण्याचा धोकाही टाळू शकतो.

मागील काही वर्षांत जनावरांपासून मानवाला होणारे रोगांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात रेबिज आणि ब्रुसेला महत्त्वाचे आहेत. दोन महिन्यांपूर्वी किणये येथील एका युवकाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत कुत्र्याकडूनच युवकाला रेबिजची लागण झाली होती. अशा घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या रोगांची जागृती होणेही आवश्यक आहे. त्याबरोबर लागण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही ज्ञात राहणे गरजेचे आहे. ब्रुसेला रोगाची लागण झालेल्या जनावराच्या संपर्कात आल्यास मानवाला लागण होते. विशेषत: यामध्ये गर्भपाताच्या घटना घडू शकतात. प्राण्यापासून मानवाला रोगाची लागण झाल्यास स्नायूचे दुखणे, ताप, श्वसनाच्या समस्या, चक्कर येणे आणि इतर समस्या जाणवतात. अशावेळी तातडीने लक्षणावर लक्ष ठेवून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही पशुसंगोपन खात्याने केले आहे. शिवाय प्राणी चावल्यामुळे किंवा खरचटल्यामुळे त्वरित स्वच्छता करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Advertisement

2030 पर्यंत रेबिज निर्मूलनाचे ध्येय

प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या रोगांच्या जागृतीसाठी झुनोटिक डे साजरा केला जातो. यामध्ये रेबिज रोगाचा अधिक प्रभाव आहे. यावरती प्रतिबंधक लसीकरण हा एकच उपाय आहे. मिशन रेबिज अंतर्गत 2030 पर्यंत देशातून रेबिज निर्मूलनाचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कुत्र्यांना मोफत लसीकरण दिले जात आहे.

- डॉ. आनंद पाटील (तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी)

प्राण्यांपासून मानवाला लागण होणाऱ्या रोगांची माहिती

  • रेबीज : कुत्रे, मांजर आणि वटवाघुळ यांच्याद्वारे पसरणारा गंभीर आजार.
  • स्वाईन फ्ल्यू : डुकरांमधून मानवामध्ये पसरणारा फ्ल्यू व्हायरस.
  • बर्ड फ्ल्यू : पक्ष्यांमधून मानवामध्ये पसरणारा आजारा.
  • लाइम रोग : टिक्सद्वारे पसरणारा जीवाणूजन्य आजार.
  • लिस्टरिओसिस : दूषित खाद्यपदार्थांमधून पसरणारा जीवाणूजन्य आजार.

प्रतिबंधात्मक उपाय 

  • लसीकरण : आपल्या पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करणे.
  • स्वच्छता राखा : प्राण्यांच्या संपर्कानंतर हात स्वच्छ धुणे.
  • सुरक्षित खाद्यपदार्थ : योग्य तापमानावर खाद्यपदार्थ शिजवणे आणि साठवणे.
  • प्राण्यांचे निरीक्षण : पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे.
  • व्यक्तिगत सुरक्षा साधने : प्राण्याच्या संपर्कात जाताना हातमोजे आणि मास्क वापरणे.
Advertisement
Tags :

.