For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेताल वक्तव्याची गरज आहे का?

06:30 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
बेताल वक्तव्याची गरज आहे का
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी हरिद्वारच्या पतंजली औषध निर्मिती कंपनी व त्यांचे संस्थापक रामदेव महाराज यांना, औषध निर्मितीबाबत जे काही दावे करीत आहात ते खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीच्या जाहिराती थांबवा व तसे केले नाही तर प्रत्येक उत्पादनावर रु. 1 कोटीचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा दिला. रामदेव बाबा यांनी देशात आयुर्वेद क्षेत्रात क्रांती घडविली, हे कोणीही मान्यच करणार व त्यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. उलटपक्षी आयुर्वेदाच्या नावाने, योग प्रशिक्षणाच्या नावाने लुबाडणाऱ्यांचा धंदा हा केवळ रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेमुळेच बसला. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठविणाऱ्यांचा धंदाही बाबा रामदेव यांच्या योग थेरपीमुळे अडचणीत आला. भारताचेच असे नव्हे तर जागतिक पातळीवर आयुर्मान वाढण्यात रामदेव महाराजांनी मोलाची कामगिरी बजाविलेली आहे, यात शंकाच नाही. रामदेव महाराजांनी गेली कित्येक वर्षे पतंजली संस्थेच्या स्थापनेतून अनेक रुग्णांना दिलासा दिला. मधुमेह, लठ्ठपणा, वातविकार, हृदयरोगींपासून अनेक रुग्णांना असाध्य रोगांपासून मुक्त केले. ‘योग भगाये रोग’ हेच ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी देश-विदेशात जाऊन मोफत योग शिबिरे घेतली. एवढेच नव्हे तर हिंदुंबरोबरच मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांना देखील आपल्या योग प्रशिक्षणांतून दिशा दिली. योग आणि आयुर्वेदाबाबत मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न बाबा रामदेव यांनी केलेला आहे. त्यातून त्यांनी तिन्ही धर्मियांना एकत्र आणण्याचा देखील राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केला. योग प्रशिक्षणांद्वारे त्यांनी योग विषयक जागृती केली. योगऋषी पतंजलीने शेकडो वर्षांपूर्वी भारतातील अनेक वनस्पतींचा अभ्यास करून त्यातील औषधी गुण तसेच विविध रोगांवर त्यांनी संस्कृतमधून उद्घृत करून ठेवलेले. जगात भारताकडे असलेला हा फार मोठा खजिना होता. देशात अवघ्या काही प्रमाणात आयुर्वेदिक डॉक्टर्सही तयार झाले मात्र भारतीय आयुर्वेद परंपरेत आयुर्वेदिक डॉक्टर्स वा वैद्य रुग्णांना तपासणी दरम्यान जी काही औषधे तयार करून देत असत, त्याविषयी कोणतीच माहिती रुग्णांना देत नव्हते. अशावेळी पतंजलीच्या माध्यमातून रामदेव महाराजांनी रुग्णांना आपण कोणत्या गोळ्या वा कोणत्या औषधी वनस्पती देत आहोत, याची माहिती तर दिलीच शिवाय आयुर्वेदाची महागडी औषधे अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली. यामुळे अनेक आयुर्वेदिक वैद्यांचा व्यवसाय बसला. अत्यल्प दरात औषधांची निर्मिती करून अत्यंत महागड्या दरात औषधे विकणाऱ्या आयुर्वेदिक कंपन्यांचे काळे धंदे बुडित निघाले मात्र कोट्यावधी जनतेला बाबा रामदेव यांनी लाभ करून दिला. यातून ज्या रुग्णांना त्यांचा लाभ झाला ते स्वस्थ बसले आणि ज्यांचे काळे धंदे बसले त्यांनी मात्र रामदेव बाबांची व त्यांच्या पतंजली आयुर्वेदिक संस्थेची देखील सर्वत्र बदनामी सुरू केली. पतंजलीची औषधे बनावट, जनतेची ते फसवणूक करतात इथपासून बाबा रामदेवांना अटक करा इथपर्यंत मागण्याही अनेकांनी केल्या. ऐन कोविडच्या काळात देखील रामदेव महाराजांनी देशातील कोट्यावधी जनतेला दिलासा दिला. त्यांनी निर्माण केलेल्या औषधाला केंद्राकडून फार उशीरा मान्यता मिळाली. तत्पूर्वी कोविड विरोधी औषधांच्या त्यांच्या निर्मितीवरही केंद्राच्या आयुष मंत्रालयाने देखील बंदी घातली मात्र रामदेव बाबांनी निर्माण केलेली अनेक औषधे ही परिणामकारक होती. ज्यांना आपली औषधे मिळत नाहीत, त्यांनी अमृतवेल उकळवून घ्या, तुळशीचा वापर करा, आल्याचा वापर करा, असे अनेक घरगुती उपचार सूचवून असंख्य जनतेचे प्राण वाचविले होते. रामदेव महाराज व त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांचे भारताच्या आयुर्वेदिक चळवळीत फार मोठे योगदान आहे व हे भारताला, येथील प्रशासनाला व देशातील नागरिकांना मान्य करावेच लागेल. मात्र हे करीत असताना व आपल्या औषधांचा प्रचार आणि प्रसार करताना रामदेव महाराज इतर औषधांच्या निर्मितीवर, त्यांच्या रसायनयुक्त औषधांच्या ब्रँड्सवर ज्या पद्धतीने त्यांची नावे पुकारून टीका करतात, हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे. प्रत्येकाला आपापल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार करण्याचा पूर्ण हक्क आहे व अधिकार आहे मात्र दुसऱ्यांचे उत्पादन हे शरीराला घातक आहे, त्यातून तुम्हाला कर्करोग होऊ शकतो वगैरे इशारा देऊन जाहीरपणे वक्तव्य करणे, हेच रामदेव महाराजांच्या अंगलट येत आहे. तरी कोणी व कोणत्याही कंपनीने रामदेव महाराजांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला नाही, हेच आश्चर्य. कोविडच्या काळात जी लसीकरण मोहीम चालू केली होती त्या मोहिमेविरोधात व अधिकृत मान्यता असलेल्या औषधांच्या विरोधात प्रचार रामदेव महाराजांनी जोरदार आघाडी उघडली होती आणि या लसीचे गंभीर परिणाम माणसांवर होतील वगैरे प्रचार तथा बदनामी केल्यामुळे भारतीय वैद्यकीय संघटना (इंडियन मेडिकल असोसिएशन) या डॉक्टरांच्या संघटनेने बाबा रामदेव यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. या सुनावणीवर निवाडा देताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांनी पतंजली आयुर्वेदाला सावधानतेचा इशारा दिला. या इशाऱ्याने तरी रामदेव महाराज गप्प बसतील! त्यांनी पुन्हा तेच तुणतुणे चालू करून आम्ही चुकीचे असलो तर केवळ 1 कोटी नव्हे तर रु. 1 हजार कोटींचा दंड ठोठवा आणि नाहीतर फासावर लटकवा आम्हाला, असे निवेदन त्यांनी करावे म्हणजेच पुन्हा एकदा आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे. देशात सर्वांनाच समान कायदे कानून आहे व माणूस केवढाही मोठा असला तरी राष्ट्राचे कायदेकानून हे सर्वांनीच पाळणे आवश्यक आहे. तेव्हा बाबा रामदेव महाराज यांनी थोडे सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. पतंजली संस्थेने जे कार्य केले आहे, त्याची जगात सर्वत्र कीर्ती पसरलेली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. रामदेव महाराजांनी उभारलेला पतंजली हा अतिभव्य संसार हे जगातील एक आश्चर्य आहे. एवढे चांगले कार्य करणाऱ्या रामदेव महाराजांनी मानवजातीची फार मोठी सेवा बजावलेली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.