झारखंडमध्ये जवळपास 68 टक्के मतदान
528 उमेदवारांची भवितव्य मतदानयंत्रात बंद : आता निकालाची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात बुधवारी 38 जागांवर मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 67.59 टक्के मतदान झाले. त्यानंतरही काही जागांवर मतदान सुरू असल्यामुळे मतदानाची टक्केवारी 68 टक्क्यांवर पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोग गुरुवारी जाहीर करणार आहे.
झारखंडमध्ये विधानसभेसाठी बंपर मतदान झाल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंत येथे 61.47 टक्के मतदान झाले. येथे सत्ताधारी इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यातच लढत आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 पैकी 38 जागांवर बुधवारी मतदान झाले. या टप्प्यात एकूण 528 उमेदवार रिंगणात असून सर्वांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. आता निवडणुकीचा निकाल शनिवार, 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन आणि विरोधी पक्षनेते अमर कुमार बौरी (भाजप) यांच्याशिवाय 500 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरवले जाईल. या निवडणुकीसाठी 14,218 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. नक्षलप्रवण क्षेत्रात 31 बूथवरील मतदान दुपारी 4 वाजता संपवण्यात आले. तर उर्वरित ठिकाणी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. यामध्ये धनबाद, बोकारो, दुमका, पाकूर, गिरिडीह, साहिबगंज, कोडरमा, देवघर, जामतारा, रामगढ, रांची आणि हजारीबाग जिल्ह्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख नियोजन करण्यात आले होते.