Karad News: कराडकरांनो सावधान! प्रतिसंगमाजवळ कोयना नदीत मगरीचे दर्शन
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आवाहन
कराड : कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमानजीक गोटे गावच्या हद्दीत कोयना नदीच्या काठावर शनिवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मगरीचे दर्शन झाल्याने कराड शहर व गोटे गावच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत वनविभाग व घटनास्थळावारून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शहरातील किरण शिंदे व त्यांचे सहकारी कोयना नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना गोटे गावच्या हद्दीत नदीच्या काठावर मगरीचे दर्शन झाले.
दुपारी ऊन पडल्याने हि मगर उन्हाला पहूडलेली दिसली. जवळपास सव्वा तीन वाजेपर्यंत मगर त्याच ठिकाणी होती. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली व मगर बघण्यासाठी नागरिकांनी नदी काठावर गर्दी केली. सव्वा तिन वाजण्याच्या सुमारास मगर पुन्हा पाण्यात गेली.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल संतोष जाधवर व वनरक्षक पुजा खंडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तसेच मगर दिसलेल्या परिसरात मासेमारी, कपडे धुण्यासाठी अथवा पोहण्यासाठी नागरिकांनी जावू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात येथून जवळच असलेल्या सैदापूर हद्दीतील कोंडर नावाच्या माळीत कृष्णा नदीच्या काठावर मगरीचे दर्शन झाले होते. मगर एका जागेवर थांबत नाही त्यामुळे शनिवारी दिसलेली मगर व सैदापूर येथे दिसलेली मगर एकच असल्याचा आंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्रतिसंगमात पोहण्यासाठी दररोज अनेक नागरीक येत असतात मात्र या परिसरात वारंवार मगरीचे दर्शन होत असल्याने पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांतही भितीचे वातावरण असून पोहयला येणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.