For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडचीत एनडीआरएफची बोट उलटली

11:10 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुडचीत एनडीआरएफची बोट उलटली
Advertisement

जवानांकडून दोघांना जीवदान : बोटही नदीतून काढली बाहेर

Advertisement

वार्ताहर /कुडची

येथे नगरपरिषदेच्या नदीच्या काठावर असणाऱ्या जॅकवेलमधून पंपसेटच्या माध्यमातून शहरात नळांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 5-6 दिवसांपासून पंपसेटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नगरपरिषदेचा पाणीपुरवठा बंद पडल्याने मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत होणाऱ्या गैरसोयीबदल कल्पना दिली. सदलगा येथील एनडीआरएफच्या तुकडीला गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी येथे आणण्यात आले. विश्वास यांच्या नेतृत्वात सुमारे 30 जणांची तुकडी आली होती. त्यांनी 2 बोटी तयार करुन प्रत्येकी सहाजण आपापल्या बोटीने जॅकवेलकडे निघाले. त्यातील एका बोटीत नगरपरिषदेचा कर्मचारी प्रताप पार्थनहळ्ळी व  हेस्कॉमचे लाईनमन काशिनाथ कांबळे यांच्यासह तुकडीचे अन्य चौघेजण गेले होते. तिथे पहिल्या बोटीत असणारे सर्वजण सुखरूप उतरले. दुसरी बोट तिथेच उलटली. त्यातील सहाजण वेगवेगळ्या दिशेने प्रवाहात वाहून जात होते.

Advertisement

लाईफ जॅकेट असल्याने प्रवाहात ते पाण्यावर राहिले. तुकडीतील अन्य जवानांनी या दोघांना धैर्य सोडू नका, अशी विनंती केली. तसेच मुख्य प्रवाहातून कडेला जाण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या दोघांनी काठावरील झाडांचा आधार घेतला. काशिनाथ एकीकडे तर प्रताप दुसरीकडे जाऊन सुखरूप थांबले. त्यानंतर काशिनाथला त्यांच्या खात्यातील सहकाऱ्यांनी सादिक गोरेपीरजादे यांच्या शेतातील काठावर दोरीच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढले. तर प्रतापला एनडीआरएफची तुकडी आपल्या बोटीद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी झाली. तर त्यांच्या तुकडीतील अन्य सहकाऱ्यांनाही बोटीच्या सहकाऱ्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. कुडची येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच नदीकाठावरील परिसरात मोठी गर्दी झाली होती. येथील उपनिरीक्षक प्रितम नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त येथे ठेवला होता. लाईफ जॅकेट असल्याने दोघांचे प्राण वाचले. जॅकवेल येथे अडकलेली बोट अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले.

Advertisement
Tags :

.