एकत्रिकरणाची चर्चा अन् स्वतंत्र वर्धापनदिन, NCP चं नेमकं कोडं काय?
मेळाव्यात बोलताना अजितदादांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला
By : सकृत मोकाशी
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षांचे वर्धापनदिन मेळावे स्वतंत्रपणे पुण्यात पार पडल्याचे पहायला मिळाले. असे असले, तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे कोडे अजूनही कायम आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका चार प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय अलिकडेच घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युती वा आघाडीबाबतही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करूनच पुढील भूमिका ठरवू, असे ज्येष्ठ शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे युती करून लढायचे की स्वतंत्रपणे, याचे कोडे राष्ट्रवादी कसे सोडवणार, याबाबतही औत्सुक्य असेल. राष्ट्रवादी अजितदादा गटाने आपल्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालेवाडीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, नवाब मलिक, खासदार सुनेत्रा पवार, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची मांदियाळी या मेळाव्यात जमली होती.
मेळाव्यात बोलताना अजितदादांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला. एनडीएसोबत जाण्याचा निर्णय हा त्याचाच भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. चार प्रभाग पद्धती स्वीकारून कामाला लागण्याचे दादांनी कार्यकर्त्यांना केलेले आवाहन बरेच काही सांगते. स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, ही त्यांची भूमिका सर्व पर्याय खुले ठेवल्याचे निदर्शक ठरते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पुण्यातील बालगंधर्व सभागृहात झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी या मेळाव्यास संबोधित गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिलांना संधी देण्याची पक्षाची भूमिका या वेळी शरद पवार यांनी जाहीर मांडली. त्यामुळे तिकीट वाटपात महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाण्याची शक्यता असेल.
याशिवाय आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचे की स्वतंत्रपणे सामोरे जायचे, याचा निर्णय जिल्हा नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतला जाणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. हे बघता काही भागात स्वतंत्रपणे जाण्याचा किंवा एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा पर्याय शरद पवार गटाकडून अवलंबला जाऊ शकतो, असा निष्कर्ष काढता येईल.
राज्य सरकारने मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुकांमध्ये चार प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांचा विचार केला, तर या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप सर्वाधिक स्ट्राँग आहे. त्यानंतर सर्वांत ताकदवान पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे पाहिले जाते.
तथापि, विधानसभेच्या यशानंतर बहुतेक नेत्यांचा कल अजितदादा गटाकडे आहे. भोसरीतून विधानसभा लढवलेले शरद पवार गटाचे नेते अजित गव्हाणे हेही दादा गटाच्या वाटेवर आहेत. पिंपरीत दादा गटाचे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. याशिवाय माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल अशा नेत्यांची फळी व कार्यकर्त्यांची फौज या बळावर भाजपला आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल.
शिरूरचे शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पिंपरी चिंचवडच्या काही भागात प्रभाव आहे. पण, दादा गटाच्या तुलनेत शरद पवार गटाची ताकद तोकडी भासते. स्थानिक पातळीवर युती वा आघाडी पिंपरी चिंचवडमध्ये ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असतील.
२०१७ ला भाजपाचे ७७, तर राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक येथून निवडून आले होते. तर सेनेने ९, मनसेने १, तर अपक्षांनी ५ जागा जिंकल्या होत्या. आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राष्ट्रवादीची ताकद नक्कीच विभागली जाईल. झाल्यास बंडखोरीची शक्यता अधिक असते.
स्वाभाविकच पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षातील जिल्हा व शहर स्तरावरील नेत्यांचा कल स्वबळाकडे असतो. या निवडणुकीतही पुणे, पिंपरी वा अन्यत्र तो तसाच राहील, असे दिसते. पुणे मनपात प्रभागांची संख्या ४२ असून, एकूण १६५ नगरसेवक निवडले जातील.
२०१७ मध्ये पुण्यातून भाजपचे ९४, तर राष्ट्रवादीचे ४०, सेनेचे १०, काँग्रेसचे ११, मनसेचे २ नगरसेवक निवडून आले. पुण्यात भाजपकडे नेते, कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. त्यांना टक्कर देणे कुठल्याच पक्षासाठी सोपे नसेल. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची कमी अधिक प्रमाणात या भागात ताकद आहे. तथापि, ठाकरे सेना, शिंदे सेनेचा फार प्रभाव नाही.
काँग्रेसही कमकुवत झाली आहे. सगळी समीकरणे बघता अजितदादा गटाने पिंपरीबरोबरच पुण्यातही स्वतंत्रपणे लढण्याचा व नंतर एकत्र मार्ग स्वीकारला तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. अर्थात त्यांनी अजून तरी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असते. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचा कल हा स्वतंत्र लढण्याकडेच असतो.