सांगलीत Sthanik Swarajya Sanstha चे निकाल वेगळे लागणार?, Jayant Patil यांचे ठाण
प्रचार दौऱ्याबरोबरच पाटील यांचे लक्ष सांगली जिल्ह्याच्या राजकारणाकडे वळणार?
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पद मुक्त झाले तर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू शकतात. यामुळे सांगली महानगरपालिका, जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या पैकी अनेक निवडणुकांचे निकाल वेगळे लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
१० जून २०२५ रोजी पुण्यात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज व्यक्त करत राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होईल आणि १५ जुलैला जयंतराव पदाचे हस्तांतर करतील अशी चर्चा आहे.
तसे झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यभरातील प्रचार दौऱ्याबरोबरच पाटील यांचे लक्ष सांगली जिल्ह्याच्या राजकारणाकडे वळण्याची शक्यता आहे. सांगलीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. लवकरच त्या होण्याची शक्यता आहे.
पाटील यांनी इस्लामपूर येथे कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आणि इच्छुकांची छाननी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते. जिल्हा परिषद आणि सांगली महानगरपालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वर्चस्व होते. तर पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्ता होती.
पाटील यांनी यापूर्वी सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कमी सहभाग दाखवला होता. परंतु आता त्यांच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे. बाळबा, शिराळा विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, जत या तालुक्यांमध्ये काँग्रेससोबत ते आघाडी उभी करू शकतात.
तसे त्यांनी यापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत यश मिळवले होते. पाटील यांच्या रणनीतीमुळे सांगलीतील राजकीय समीकरणे बदलू शकतात. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील चुरस तीव्र होण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यापूर्वी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले आहे.
ज्यामुळे त्यांची पकड मजबूत आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा परिषदेला झालेला विस्कळीतपणा यावेळी दुरुस्त करण्याची त्यांना संधी मिळू शकते. स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्षाला अधिक जागा मिळण्याचीही शक्यता आहे.
पालकमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जयंतरावांकडून जिल्ह्याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. सत्तेच्या कार्यकाळात सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. त्याचा परिणाम सत्ता गेल्यानंतर अनेक मंडळींनी पक्षापासून अंतर राखण्यात झाला. सांगली मिरज कुपवाड शहरांमध्ये तर पक्षाची वाताहत झाली.
अजित पवार यांनी मुद्दामहून लक्ष घालून जिल्ह्यात आपला गट सक्रिय होईल अशी व्यवस्था केली. सध्या अशी दिग्गज मंडळी अजित पवारांच्या पश्नात आहेत. त्यांचे लक्ष्य जयंतराव पाटील हेच असू शकेल. काही लोकांना जयंतराव आणि विश्वजीत कदम यांनी एकत्र येऊन सोबत विशाल पाटील, रोहित पाटील यांनाही घेऊन जिल्ह्यात मोट बांधावी अशी अपेक्षा होती. मात्र आतापर्यंत जयंतरावांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
परिणामी वैतागून त्या मंडळींनी अजितदादांसोबत जाण्यास पसंती दिली. अशा मंडळींचे दादांच्या आणि भाजपच्या कारभाऱ्यांशी पटले नाही तर ते जयंतरावांच्या संपर्कात येऊ शकतात. ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बळकटी मिळू शकेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटील यांच्या रणनीतीमुळे सांगलीत राष्ट्रवादीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्यांची राजकीय बाटचाल भविष्यात कोणत्या दिशेने होते, त्यानुसार जिल्ह्यातील राजकारण सुद्धा बदलणार आहे.