पक्षांतर केलेल्या नेत्यांना कायदा धाब्यावर बसवून अभय : विराज नाईक
विटा प्रतिनिधी
देशात सध्या काही नेते दबावाला घाबरून तर, काही नेते स्वार्थ साधण्यासाठी राजरोसपणे पक्षांतर करीत आहेत. अशा पक्षांतर केलेल्या नेत्यांना कायदा धाब्यावर बसवून चुकीच्या पध्द्तीने अभय दिले जात आहे. अशा परिस्थितीत युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ द्यावी असे आवाहन, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष विराज नाईक यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने कै.काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृह विटा येथे युवक राष्ट्रवादीचे "राज्य रक्षण - युवा प्रशिक्षण" शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी नाईक बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील , ऍड.संदीप मुळीक, माणिकराव पाटील उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाच्या विचारधारेशी बांधील तरुण कार्यकर्ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावेत. येणाऱ्या काळात पक्षाची ध्येय, धोरणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबूत व्हावी यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात अभियान राबविणार आहे. सध्या देशात आणि राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. केंद्र सरकार सरकारी यंत्रणांना हाताशी धरून राजकीय नेत्यांवर दबाव आणत आहेत. काही नेते दबावाला घाबरून तर, काही नेते आपला स्वार्थ साधण्यासाठी राजरोसपणे पक्षांतर करीत आहेत. अशा पक्षांतर केलेल्या नेत्यांना कायदा धाब्यावर बसवून चुकीच्या पध्द्तीने अभय दिले जात आहे. अशा परिस्थितीत युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ द्यावी, असे आवाहन नाईक यांनी केले.
स्वागत आणि प्रास्ताविक खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांनी केले. यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष बी. के. नायकवडी, सांगली जिल्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) वक्ता प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले. आभार सांगली जिल्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळीक यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन संभाजी मोरे, धनंजय टेके, विवेक जोग, मंदार वरुडे यांनी केले.
यावेळी नितीन दिवटे, मनोहर चव्हाण, अजित जाधव, रमेश मोहिते, सुवर्णा पाटील, भूमी कदम, अस्मिता मोरे, नानासाहेब मंडलीक, महेश फडतरे, निखिल गायकवाड, गणेश कदम, तात्यासो निकम, महादेव मंडले, पद्माकर यादव, सचिन मेटकरी, शरद मुळीक, गणेश मुळीक, सागर बेले, मनोज मंडले, गौरी सुळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.