Sangli News : ईश्वरपुरात शेतबांध वादातून मारामारी
शेतातील भांडणामुळे दोघांवर गुन्हा नोंद
ईश्वरपूर : येथे शेताच्या बांधावरुन व पाण्याच्या पाटावरून रविवारी दोन शेतकऱ्यांत मारामारी झाली. परस्परांनी खोरे व खुरप्याने हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी परस्परांविरुध्द गुन्हे नोंद झाले आहेत.
नामदेव तुकाराम शिंदे (६२ रा. पाटील गल्ली, उरुण) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेतात काम करत असताना आरोपी सुरज जगन्नाथ कुटे (३३) याने शेतातील बांध व पाण्याच्यापाटावरून भांडण काढून शिवीगाळ केली. त्याबाबत जाब विचारला असता, कुटे यांनी हातातील खोऱ्याने शिंदे यांच्या मांडीवर मारून जखमी केले.
दरम्यान कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिंदे यांच्या शेतात टॅक्टरने सरी सोडण्याचे काम सुरु होते. त्यावेळी पाटाची सरी मोडली. त्याबाबत जाब विचारुन सरी हाताने नीट करीत असताना शिंदे यांनी कुटे याच्या डाव्या हातावर, डाव्या मांडीवर खुरप्याने मारुन जखमी केले.