महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा?

06:49 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आता नियमित सुनावणी

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीसंबंधीची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयागोसमोर केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा, की शरद पवार गटाचा यासंबंधी सोमवारी आयोगासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत या दोन वकिलांनी सोमवारी दिवसभर युक्तिवाद करुन आपली बाजू मांडली आहे.

पुढची सुनावणी आता पुढील शुक्रवारी होणार असून नंतर नियमित सुनावणी घेण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने आयोगाला सादर केलेले कागदपत्र बनावट आहेत, असा दावा सिंघवी यांनी केला. शरद पवार गटाने हजारो कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर ठेवले आहे. तसेच विरुद्ध पक्षाची कागदपत्रे कशी बनावट आहेत, हे वर्गवारी करुन स्पष्ट करण्यात आले आहे, असे युक्तिवादानंतर सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गुन्हा दाखल करणार

अजित पवार गटाने 26 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आम्ही त्याची सखोल छाननी केली आहे. हे प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा दावा आम्ही केला आहे. तसेच बनावट कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले.

केवळ विलंब करण्याचा डाव

सुनावणी जास्तीत जास्त काळ लांबावी असा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे, असा आरोप अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी नंतर केला आहे. सोमवारच्या युक्तिवादात पुन्हा पुन्हा तेच तेच मुद्दे मांडण्यात आले. नैसर्गिक न्यायाच्या मुद्द्यावर पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आमचा पक्ष भक्कम असून आमचा विजय होईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

शरद पवार यांची उपस्थिती

सोमवारच्या सुनावणीला शरद पवार स्वत: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते तेथे होते. आपल्या वकिलांचे युक्तिवाद त्यांनी लक्षपूर्वक ऐकल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. अजित पवारही स्वत: सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी येतील, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. तथापि, आमच्या गटाने असे कधी सांगितले नव्हते, असे तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर, सुनिल तटकरे आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची सुनावणीप्रसंगी उपस्थिती होती. तर शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

वाद नेमका काय आहे?

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र सरकार स्थापन केले. त्या सरकारचे जुलै 2022 मध्ये पतन झाले. शिवसेनेचा गट वेगळा होऊन त्याने आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रतिपादन केले. ते केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले होते. त्यानंतर एक वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजितदादा पवार यांचा 40 आमदारांचा गट वेगळा झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाचा पक्ष खरा हा वाद उफाळून आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले असून युक्तिवाद होत आहेत. आयोगाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीच्या आत द्यावा लागणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article