For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्तपात थांबवण्यासाठी नक्षली गट चर्चेला तयार

06:26 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रक्तपात थांबवण्यासाठी नक्षली गट चर्चेला तयार
Advertisement

संघटनेकडून सरकारला प्रस्ताव : दुसऱ्या दिवशीही चकमक

Advertisement

वृत्तसंस्था/ नारायणपूर

गेल्या काही दिवसात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीच्या घटना वाढल्या आहेत. नक्षली कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा जवानांनी जोरदार मोहीम सुरू केलेली असतानाच छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्याभरात पाचवेळा मोठ्या चकमकी झाल्या आहेत. यामध्ये 25 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यामुळे आता काही नक्षली संघटनांनी सरकारशी चर्चेची तयारी दर्शविल्याचे समजते.

Advertisement

छत्तीसगडमध्ये गुरुवारी आठ नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर नक्षली संघटनेने सरकारशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्याने सरकारला पत्र लिहिले असून त्यात रक्तपात थांबवण्यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच नक्षलवाद्यांना ‘मुख्य प्रवाहात परत या’ असे आवाहन केले होते. या आवाहनाला नक्षली संघटनेने प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. आता मध्यस्थांच्या माध्यमातून नक्षली संघटनेचा म्होरक्या आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये नजिकच्या काळात चर्चेच्या फेऱ्या होऊ शकतात.

नारायणपूरमध्ये पुन्हा गोळीबार

छत्तीसगडमधील नारायणपूर येथे 23 मे रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर शुक्रवार, 24 मे रोजी सकाळी आणखी एक चकमक झाली. मृत झालेल्या सात नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन सैनिक परतत असताना ही चकमक झाली. यादरम्यान जवानांनी आणखी एका नक्षलवाद्याचा खात्मा केल्यामुळे आता अबुझमद जंगलात ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 8 झाली आहे. जवानांनी येथून 8 शस्त्रेही जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान काही नक्षलवाद्यांना अटक केल्याचेही वृत्त आहे.

संयुक्त मोहीम

नारायणपूरमधील कारवाईसाठी सूर्यशक्ती, डीआरजी, बस्तर फायटर, एसटीएफच्या या विशेष दलांमधील 800 जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. यादरम्यान नक्षलवाद्यांना पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कांकेर जिल्हा आणि महाराष्ट्र सीमेवरील सीमाभागातही त्यांना प्रवेश करता येत नाही. येथेही सैनिक अलर्ट मोडवर आहेत. या संयुक्त मोहीमेमुळे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.

7 नक्षलवाद्यांचा खात्मा

23 मे रोजी नारायणपूर-विजापूर जिह्याच्या सीमाभागात नक्षलवाद्यांची प्लाटून क्रमांक 16 आणि इंद्रावती एरिया कमिटीचे नक्षलवादी लपल्याची माहिती फोर्सला मिळाली होती. या माहितीनंतर नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर जिह्यातील डीआरजी, बस्तर फायटर्स आणि एसटीएफची संयुक्त टीम शोध मोहिमेवर निघाली. याचदरम्यान, सकाळी 11 वाजता जंगलात जाताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.