For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड, झारखंडमध्ये नक्षलींचा उद्रेक

06:53 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड  झारखंडमध्ये नक्षलींचा उद्रेक
Advertisement

विजापूरमध्ये चकमक : पश्चिम सिंगभूममध्ये रेल्वेमार्गावर घडवला स्फोट, 15 हून अधिक रेल्वेगाड्या रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ विजापूर, रांची

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. नक्षलवाद्यांनी या भागात 3 आयईडी स्फोटही केले असून त्यात एक जवान जखमी झाला आहे. विजापूरच्या जंगला पोलीस ठाण्याच्या पोतेनार जंगलात ही चकमक सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. दुसरीकडे झारखंडमधील पश्चिम सिंहभूममध्ये नक्षलवाद्यांनी रेल्वे ऊळावर स्फोट घडवल्याने हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

Advertisement

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली असून त्याचे परिणामही समोर येऊ लागले आहेत. एकीकडे 11 नक्षलवाद्यांना अटक झाली असतानाच दुसरीकडे नक्षलवाद्यांचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी जवानांच्या हौतात्म्याची गंभीर दखल घेत सुरक्षा दलांना नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली असून नक्षलवाद्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. नक्षल निर्मूलन मोहिमेंतर्गत बस्तर भागातील दुर्गम भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. याचदरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे सांगण्यात आले.

स्फोट घडवल्याने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी गुरुवारी मध्यरात्री पश्चिम सिंहभूममध्ये बॉम्बस्फोट करून रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे. सीपीआय माओवादी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त केल्याने वाहतूक कोलमडली आहे. चक्रधरपूर रेल्वे विभागातील गोयलकेरा आणि पोसाईता स्थानकादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी दिवसभरात या मार्गावरून धावणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. शुक्रवार सायंकाळपर्यंत दोन रेल्वेट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या ट्रॅकचे काम अजूनही ठप्प असल्याने रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते. चक्रधरपूर रेल्वे विभागासह इतर अनेक स्थानकांवर अनेक गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.