पाच लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलीचा खात्मा
झारखंडमधील पलामूच्या जंगलात चकमक
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. यावेळी पलामू जिह्यातील मानातू पोलीस स्थानक परिसरातील बांसी गावाच्या जंगलात झालेल्या संघर्षात 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी मुखदेव यादव याचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दल आणि टीएसपीसी (थर्ड कॉन्फरन्स प्रेझेंटेशन कमिटी) नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हा नक्षली ठार झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी इन्सास रायफल जप्त केली आहे.
झारखंड पोलीस नक्षलवाद्यांविरुद्ध सतत मोहीम राबवत आहेत. गेल्या काही महिन्यांत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक रिश्मा रमेशन, एएसपी राकेश कुमार सिंह आणि हुसेनाबाद एसडीपीओ आयपीएस मोहम्मद याकूब यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांनी तरहासी आणि मानातू पोलीस स्टेशन परिसरातील सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. चकमकीत टीएसपीसीचा सक्रीय नक्षलवादी मुखदेव यादव ठार झाला.
जंगलात शोधमोहीम
चकमकीनंतर काही नक्षलवादी जंगलात आश्रय घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दिवसभर परिसरात शोधमोहीम सुरू होता. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात होता. घटनास्थळावरून जप्त केलेल्या इन्सास रायफलची तपासणी करण्यासाठी एफएसएल टीमदेखील घटनास्थळी पाठवण्यात आली होती.