For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्रपती शिवरायांमुळे नौदलास सामर्थ्य

06:58 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
छत्रपती शिवरायांमुळे नौदलास सामर्थ्य
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण : माझगाव डॉकयार्ड येथे कार्यक्रम

Advertisement

मुंबई  / प्रतिनिधी

भारतीय नौदलाच्या आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आले. लष्कर दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली असून त्यांच्याच भूमीतून नौदलाला सामर्थ्य देण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच आत्मनिर्भर भारत अभियानासाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे बुधवारी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवे सामर्थ्य, नवी दृष्टी दिली. आज त्यांच्या या भूमीवर 21 व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत. हे पहिल्यांदाच होत आहे की, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन अशा तिघांचे एकत्रित जलावतरण (कमिशन) केले जात आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कर ही तिन्ही फ्रंटलाईन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत.’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाला, निर्माणकार्याशी संबंधित सर्वांना, अभियंत्यांना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

जहाज उद्योगाचा एक समृद्ध इतिहास

‘नौदल सुरक्षा जहाज उद्योगात आपला एक समफद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाईम पॉवर बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झाले आहेत, त्यात याची झलक दिसते.’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

जगभरात भारताचे सामर्थ्य आणि विश्वासार्हता वाढत आहे. देश फक्त विस्तारवाद नव्हे तर विकासवादावर भर देत आहे. आमच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील वाढवण बंदर. 75 हजार करोड ऊपयांच्या या आधुनिक बंदराचे काम सुरू झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत, असे आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

युद्धनौका, पाणबुडीची वैशिष्ट्यो

आयएनएस निलगिरी युद्धनौका

भारतीय नौदलातील अधिकारी राहुल नार्वेकर यांनी आयएनएस निलगिरीबद्दल माहिती दिली.  निलगिरी फ्रिगेटवर शत्रूंशी लढण्यासाठी वेपन्स आणि मिसाईल्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने आठ ब्राह्मोस मिसाईल आहेत, त्या समुद्रावर मारा करतील. निलगिरीवर 32 बराक मिसाईल असून त्या आकाशातील टार्गेटवर मारा करणाऱ्या आहेत. यावर पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर असून ते पाण्यातून मारा करणारे आहे. निलगिरी 5,500 नॉटिकल प्रवास करू शकते. त्याचा वेग 28 नॉटिकल प्रतितास इतके आहे. नौदलाचे दुसरे अधिकारी प्रताप पवार यांनी देखील आयएनएस निलगिरीसंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले या युद्धनौकेचे वजन 6,670 टन असून लांबी 149 मीटर आहे. यामध्ये स्टेल्थ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

आयएनएस सूरत युद्धनौका

आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस मार्मागोवा आणि आयएनएस इंफाळ नंतर प्रोजेक्ट 15 बीची शेवटची युद्धनौका आयएनएस सूरत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गुजरात राज्याच्या एका शहराचे नाव पहिल्यांदाच युद्धनौकेला   देण्यात आले आहे. सूरत युद्धनौकेची लांबी 164 मीटर असून ऊंदी 18 मीटर तर वजन 7,600 टन आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी इथे सुद्धा ब्राह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुडीविरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स आहेत. या युद्धनौकेचे वेगळेपण म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. शिवाय पहिल्यांदाच निर्मिती वेळीच महिलांसाठी राहण्याची वेगळी सुविधा आहे, अशी माहिती आस्था कंबोज आणि अहिल्या अरविंद या महिला नौदल अधिकाऱ्यांनी दिली.

आयएनएस वाघशीर पाणबुडी

भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली आयएनएस वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. 2022 साली जलावतरण झाल्यानंतर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षानंतर ती भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर आहे. ही खोलवर समुद्रात जाऊ शकते आणि शत्रूशी दोन हात करू शकते. शिवाय 45 ते 50 दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करू शकते, अशी माहिती नौदल अधिकारी निमिष देशपांडे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.