नवरात्र उत्सवाला आधी परवानगी, नंतर नकार!
अनगोळ येथील घटना : तक्रारीवरून प्रशासनाच्या निर्णयाबाबत संताप
बेळगाव : सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पूर्ण तयारी झालेली असताना देवीची मूर्ती मंडपात स्थापना करण्यात आल्यानंतर प्रशासनाने एक दिवस आधी दिलेली परवानगी नाकारल्याने भक्तांना आणि मंडळाला धक्का बसला. एका स्थानिक विघ्नसंतोषीच्या तक्रारीवरून प्रशासनाने या उत्सवाला दिलेली परवानगी नाकारल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व भक्तांनी याचा निषेध केला आणि परवानगी रद्द केलेली नोटीस घेण्यास नकार दिला.
अनगोळ मृत्युंजयनगर महांतेश उद्यान येथे गेल्या काही वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी प्रशासनाच्या परवानगीने दुर्गामूर्ती पूजन करण्यात येते. या भागातील सिद्धकला युथ क्लब यांच्यावतीने व ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ व महिला मंडळाच्यावतीने दसऱ्याच्या निमित्ताने तात्पुरता मंडप उभारण्यात येतो व मूर्तीपूजन करण्यात येते. या कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ नागरिक आपल्या स्वखर्चाने आनंदाने कोणताही हिडीसपणा न करता, कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करतात. उत्सवकाळात सकाळ आणि संध्याकाळी दररोज स्पिकरचा गाजावाजा न करता आरतीचे आयोजन करण्यात येते. उद्यानाला मंडळ स्वखर्चाने आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करते. त्यामुळे उद्यानात फिरावयास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, बालचमूंसह महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असते.
पण गेल्या काही महिन्यापासून या भागातील एक नागरिक या उद्यानात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम व उत्सवाला प्रत्येकवेळी विरोध करत आहे. याची तक्रार शासन दरबारी करून प्रत्येकवेळी आडकाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकवेळी कोणते ना कोणते करण पुढे करून पदाधिकाऱ्यांना सतत नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
सालाबादाप्रमाणे येथील उत्सव कमिटीने प्रशासनाकडे परवानगीसाठी रितसर अर्ज दाखल केला होता. प्रशासनाने यंदाही परवानगी दिली होती. त्याप्रमाणे मंडळाने उत्सवाची सर्व तयारी पूर्ण केली आणि सकाळी मूर्ती स्थापन केली. पण येथील एका स्थानिक विघ्नसंतोषीने या कार्यक्रमाविरुद्ध स्थानिक प्रशासनाकडे व बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांकडे काही मोजक्या अज्ञातांच्या सह्या घेऊन तक्रार केली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दुसऱ्या दिवशी उत्सवाला परवानगी नाकारल्याची नोटीस बजावली. देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती आणि पूजाअर्चा पार पडल्याने या भागातील नगरसेविका वाणी जोशी व पर्दधिकाऱ्यांनी मूर्ती व मंडप काढण्यास नकार दिला. तसेच नोटीस हातात घेण्यास नकार दिला. प्रशासानाच्या या कारभारामुळे स्थानिक भक्त व उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद पाटेकर, अजित सिद्धण्णावर, अरुण गावडे, शिवानंद दूर्गेण्णावर, गणेश प्रभू, सुबोध मिटगार, प्रेमानंद शिवनगेकर व पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याबाबत प्रशासनाकडे रितसर तक्रार करणार असल्याचे सांगितले
विघ्नसंतोषीच्या वारंवार तक्रारीमुळे नाहक त्रास
सिद्धकला युथ कल्बतर्फे दरवर्षी स्थानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच उद्यानात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. हा कार्यक्रम रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही म्हणून आम्ही उद्यानात आयोजित करतो. पण अशा विघ्नसंतोषीच्या वारंवार तक्रारीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या व्यक्तीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.
-अरुण गावडे,सामाजिक कार्यकर्ते व माजी अध्यक्ष सिद्धकला युथ क्लब.