Shravan Gappa: माहेरच्या अंगणी फुलला आठवणींचा श्रावण, Navodita Ghatage यांची खास मुलाखत
ग्वाल्हेरमध्ये वाढलेल्या नवोदिता या घाटगे घराण्यात सून म्हणून आपलं स्थान लीलया सांभाळतात
By : साजिद पिरजादे, दिव्या कांबळे
कोल्हापूर : श्रावण म्हणजे आठवणींचा, परंपरांचा आणि नात्यांच्या गोड गुंफणीचा महिना. श्रावणात पावसासारख्या आठवणी बरसतात. माहेरच्या अंगणातली फुलं, आईच्या हातचा नैवेद्य, आणि एकत्र कुटुंबातल्या गप्पा-गोष्टी. याच श्रावणाच्या निमित्ताने, आपण भेटतोय एक खास व्यक्तिमत्त्व नवोदिता घाटगे यांना. ग्वाल्हेरमध्ये वाढलेल्या नवोदिता या घाटगे घराण्यात सून म्हणून आपलं स्थान लीलया सांभाळतात. शालेय जीवन, श्रावणातील गोड आठवणी, गोकुळाष्टमी उत्सव, पहिला गुढीपाडवा, आणि सासरच्या स्वयंपाकघरात शिकलेली पहिली मटकीची उसळ अशा आठवणींचा प्रवास त्यांच्या गप्पांमधून उलगडण्यात आला आहे.
1. तुमच्या बालपणीचे आणि शालेय जीवनातील काही किस्से सांगा?
उत्तर : सर्वात अगोदर मनामध्ये माहेरचा विचार येतो. आणि त्यात श्रावण असला की सोमवारी आमच्याकडे फराळ काय असायचा, रात्रीचं जेवण काय असायचं संकष्टीला काय जेवण या गोष्टींची आतुरता असायची. खूप आठवणी आहेत लहानपणीच्या. श्रावणात पाऊस पडला की आम्हाला आनंद व्हायचा. एकत्र कुटुंबामध्ये राहत होतो. लहान मुलापासून ते मोठ्या लोकांपर्यंत आम्ही सगळेच उपवास करायचो. दिवसभर खिचडी आणि संध्याकाळी साडेसात आठला उपवास सोडायचो.
2. आई-वडिलांच्या सोबतचे किस्से सांगा
उत्तर : घरी वडिलांचा धाक होता. प्रेमापोटी जो असतो तसा होता. आमचं बालपण खूप छान गेलं. एकत्र कुटुंबामुळे आमच्यावर जबाबदाऱ्या लवकर आल्या. पण, छान होतं बालपण, खूप एन्जाँय केलं. आमचा जुना वाडा होता. पप्पांच्या पायांचा आवाज आला की आम्ही सगळे अभ्यासाला बसायचो. पप्पा जरी कडक असले तरी एन्जाँय पण तेवढंच करायचे. म्हणजे जूनपर्यत आमच्याकडे सुट्या असतात त्यामध्ये ट्रीपही फिक्स असायची.
3. तुम्हाला श्रावणातला कोल्हापूर कसा वाटला?
उत्तर : श्रावणातला कोल्हापूर मी लग्नानंतर पाहिला. त्याच्याआधी मी कोल्हापुरात पायसुध्दा ठेवला नव्हता. श्रावणतला कोल्हापूर म्हणजे पाऊस आणि थंड वातावरण. सोमवार आला की परत उपवास, नैवेद्य, स्वंयपाक जुन्या परंपरा- चालीरिती. माहेरी आपण आपल्याच जगात असतो पण सासरी आल्यावर जबाबदारी येते.
4. तुमचं शालेय जीवन कसं होतं?
उत्तर : आमची मुलींची शाळा होती. सहावीपासून आम्ही सायकलने जात होतो. तिथं आम्ही मस्त एन्जाँय करायचो. संध्याकाळी एक दोन तास अभ्यास करून मग जेवायला बसायचो. त्यावेळी टीव्ही, मालिका नव्हत्या. तेव्हा नऊ ते साडेनऊला झोपायची पद्धत होती. शाळेमध्ये खूप मैत्रीणी होत्या. मुलींची शाळा असल्यामुळे माझा डान्सकडे ओढा जास्त होता. म्हणून मी डान्समध्ये खूप सहभागी व्हायचे. त्यामध्ये मी खूप सारे अॅवार्ड पटकवलेले आहेत. थोडसं ग्वाल्हेरचं वातावरण वेगळं असल्यामुळं आम्ही खेळामध्येभाग नाही घेतला. अभ्यासामध्ये ठीक ठाक होते.
5. अशी कोणती घटना आहे जी आजही आठवली की हसू येतं?
उत्तर : लहानपणी घरातल्यांना आपल्या मुलाला काही तरी चांगलं येतंय म्हणून कोणी पाहुणे आले की आपल्याला मॉडेल म्हणून उभं करतात. मग आपण डान्स करतो. त्या गोष्टींचा खूप हेवा वाटायचा. आज या गोष्टी हसण्यासारख्या वाटतात. आताची मुलं करणार नाहीत पण आम्ही करायचो.
6. श्रावणामध्ये माहेरी कशा प्रकारचे सण साजरे केले जायचे?
उत्तर : आमचं घर जुन्या वाड्यासारखं होतं. सण समारंभात एकत्र असायचे. गणपती आमच्यामुळं घरात बसायचा. पहिल्यांदा तर तिथं सगळी लोकं एकत्रित व्हायची. आदल्या दिवसापासून डेकोरेशन चालायचं. मम्मीच्या माहेराहून मामा, इथले काका सगळे मिळून गणपतीचे डेकोरेशन करायचे. श्रावणातला सण म्हटल्यावर आमच्याकडे जन्माष्टमी खूप मोठी व्हायची. आम्ही आदल्या दिवशीपासून तिथं राहायला जायचो. रात्री प्रवचन करून कृष्णाचा जन्म करून रात्री उशीरा प्रसाद नैवेद्य खाऊन आम्ही तिथंच झोपायचो
7. लग्नानंतर तुमचा पहिला सण कोणता होता?
उत्तर : पहिला गुढीपाडवा आला. कारण डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. संक्रांत, गुढीपाडवा हे पहिले सण होते. संक्रांतचं आपल्याकडे वैशिष्ट्या असं होतं की, पहिली संक्रांत खूप महत्वाची असते. मग त्याच्यानंतर पहिला सण होता गुढीपाडवा.
8. घाटगे घराण्याची सून म्हणून स्थळ आले होते का?
उत्तर : खरं, सांगू तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण समरजीतसिंह यांचा बायोडेटा साधा होता. त्यामध्ये कुठेही कोण घराणेदार आहे किंवा श्रीमंत किंवा राजे असा कुठेही उल्लेख नव्हता. आमचं लग्न ठरेपर्यंत मला माहीतही नव्हतं की ही फॅमिली काय आहे. मोठ्या राजेंना असं कधीच वाटलं नाही, आपण आपला जो काही स्टेटस आहे त्याचा गाजावाजा करावा. आणि त्याच कारणांने त्यांना एकदम साध्या घराण्यातील मुलगी पाहिजे होती आणि तसंच झालं.
9. श्रावणामध्ये राजेंना कोणता पदार्थ आवडतो?
उत्तर : मी खरं सांगू मी स्वयंपाक इथेच शिकले आहे. आपण एकत्रित कुटुबांत असताना काकी, मावशी, आई, आज्जी ही सगळी लोकं किचनमध्ये असताना आम्हाला किचनमध्ये जाण्याची गरजच नव्हती. त्यामुळे काहीच शिकले नाही. लग्न ठरल्यानंतर फोडणी टाकायला आणि हलके फुलके वगैरे बनवायला यायला लागलं. जेव्हा इथे आले तेव्हा आईंनी सांगितले की नवोदिता किचनमध्ये जाऊन काहीतरी करा. मी म्हटलं काय करू, मला तर काहीच येत नाही. आईनी अशाच खूप गोष्टी शिकवल्या. मी पहिल्यांदा जो पदार्थ केला होता तो म्हणजे मटकीची उसळ. ती डॅडींनी खूप आवडीने खाल्ली होती. एकदा चिकन केलं होतं. त्याच्यामध्ये मम्माने पाणी सागितलं नाही म्हणून मी चिकन 65 करून टाकलं होतं. पुरण पोळी अजून ट्राय केलेली नाही. मोदक वगैरे आम्ही करतो.
10. तुम्हाला फुगडी घालता येते का?
उत्तर : फुगडी घालता येते आणि उखाण्यांमध्ये मी अशी काही माहीर नाही. दुसरे खेळ एवढे नाहीत जमत. मंगळागौर येत नाही पण लग्नाच्या पहिल्या वर्षी असे कार्यक्रम झाले होते. आईंनी त्यांच्या मैत्रीनींना बोलावलं होतं. त्यानंतर माझ्या मैत्रीणी होत्या आणि मग मस्त त्यांना वाण वगैरे देऊन तेवढाच छान कार्यक्रम आम्ही केला होता.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=hHj6dSiGUn8[/embedyt]