नवगोबा देवाच्या जागेचा प्रश्न मार्गी
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : दोन गुंठे जागा महालक्ष्मी देवस्थान मंडळाला देणार
प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या नवगोबा देवाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या 15 दिवसांत तोडगा काढून जागेचा ताबा महालक्ष्मी देवस्थान मंडळाकडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला शहर देवस्थान कमिटी, केएसआरटीसी, स्मार्ट सिटी, कॅन्टोन्मेंट आणि लष्कर अधिकारी उपस्थित होते.
नवगोबा देवाच्या जागेच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शहर देवस्थान कमिटीच्यावतीने दरवर्षी नवगोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात असलेल्या जागेत यात्रा करण्यासाठी केएसआरटीसी आणि लष्कराची परवानगी घ्यावी लागत होती. त्यामुळे जागेचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे याबाबत चर्चा करून कायमचा तोडगा काढण्यासाठी शनिवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या शासकीय विश्रामगृहाजवळ लष्कराची 34 गुंठे जमीन आहे. त्यापैकी दोन गुंठे जमीन महालक्ष्मी देवस्थान मंडळाच्या नावे पूर्वीपासून आहे. जुने दस्तावेज यावेळी अधिकाऱ्यांनी बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द केले. जागेचा नकाशाही देण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने ठराव करून काही वर्षांपूर्वी दोन गुंठे जागा महालक्ष्मी देवस्थान मंडळाच्या नावे करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी नवगोबा यात्रा साजरी करण्यासाठी केएसआरटीसी आणि लष्कराकडे परवानगी घ्यावी लागत होती. त्यामुळे ही कटकट कमी होणार आहे. येत्या 15 दिवसांत जागेबाबत तोडगा काढून ताबा देवस्थान मंडळाकडे देण्यात यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
सध्या नवगोबाचे लहान असलेले मंदिर नवीन जागेत बांधण्यात येणार आहे. सदर जागेचा सर्व्हे करण्याची सूचनाही बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यामुळे जागेचा सर्व्हे करण्यासाठी येणार असल्याचे बेळगाव शहर कमिटीला कळविण्यात आले. एकंदरीत नवगोबा देवाच्या जागेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागल्याने देवस्थान कमिटी आणि बेळगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी बेळगाव शहर देवस्थान कमिटीचे रणजित चव्हाण-पाटील, परशराम माळी आदी उपस्थित होते.