मॉरिशसमध्ये नवीन रामगुलाम यांच्या पक्षाचा विजय
पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या पक्षाचा सर्व जागांवर पराभव : ऑडिओ टेप लीक होणे भोवले
वृत्तसंस्था/ पोर्ट लुइस
मॉरिशसमध्ये 10 नोव्हेंबर रोजी संसदीय निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत लेबर पार्टीचे नेते आणि माजी पंतप्रधान नवीन रामगुलाम यांना विजय मिळाला आहे. तर वर्तमान पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचा पक्ष सोशलिस्ट मूव्हमेंटला एकही जागा जिंकता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशस संसदीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या नवीन रामगुलाम यांचे अभिनंदन करत त्यांना भारत दैऱ्याचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांदरम्यान भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याकरता उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मागील महिन्यात मॉरिशसमध्ये सोशल मीडियावर काही ऑडिओ टेप्स व्हायरल झाल्या होत्या. यात सरकारवर भ्रष्टाचाराशी निगडित अनेक आरोप करण्यात आले होते. यामुळे देशात नकारात्मक वातावरण तयार झाले आणि प्रविंद जगन्नाथ यांच्या पक्षाला निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
मॉरिशसच्या संसदेत 70 जागा असल्या तरीही केवळ 62 जागांकरता मतदान होते. यंदाच्या निवडणुकीत रामगुलाम यांच्या लेबर पार्टीच्या ‘अलायन्स डू चेंजमेंट’ आघाडीला 62 जागांवर विजय मिळाला आहे. तर जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी लेलेपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
मॉरिशसमध्ये भारतीय वंशाचे लोक बहुसंख्याक आहेत. संसदेत भारतीय वंशीयांचे नेहमी वर्चस्व राहिल अशी तेथील मूळ लोकांना स्वातंत्र्यावेळी चिंता होती, त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी मॉरिशसमध्ये बेटर लूजर सिस्टीम अवलंबिण्यात आली होती. याच्या अंतर्गत 8 जागांवर मागास समुदायाच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले जाते.
पंतप्रधान जगन्नाथांना पराभव मान्य
देशाला पुढे नेण्यासाठी जे काही करू शकत होते, ते मी केले आहे. परंतु जनतेने दुसऱ्या पक्षाला विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान जगन्नाथ यांनी पराभवानंतर व्यक्त केली आहे. जगन्नाथ हे 2017 पासून देशाचे पंतप्रधान होते. मागी महिन्यातच मॉरिशसने ब्रिटनकडून वादग्रस्त चागोस बेटसमूहाचे नियंत्रण मिळविले होते. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी या मुद्द्याद्वारे जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न केल होता, परंतु त्यांचा पक्ष मोठ्या वादात सापडला. मिस्सी मुस्टास नावाच्या एका युट्यूब चॅनेलने ऑक्टोबर महिन्यात देशातील मोठे नेते, वकील, अधिकारी आणि पत्रकारांचे फोन टेप्स लीक केल्या होत्या. यातून अनेक खुलासे झाले होते. यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. तर जगन्नाथ सरकारने या ऑडिओ टेप खऱ्या नसून एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. तसेच 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण देशात सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती.