महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ल्यात 'नवांकुर बालकुमार मराठी साहित्य संमेलन

03:42 PM Dec 09, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्लाच्या वतीने आयोजन

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. हा तेजस्वी वारसा उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला समजावून दिला पाहिजे. साहित्यातील विविध भावभावनांच्या परिपोषातून व वैचारिक वाङ्ममयाच्या विचारधारेतून मुलांच्या मनःपिंडाचे पोषण होत असते. त्यासाठी विद्यार्थ्याना साहित्याची आवड निर्माण व्हावी, ललित साहित्याविषयीची अभिरूची निर्माण व्हावी, मुलानी अवांतर वाचन करावे, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडवून आणावी ही व अशीच अन्य उद्दिष्टे समोर ठेवून आनंदयात्री वाङ्मय मंडळाने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यापूर्वी आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक साहित्य संमेलने घेतली आहेत. आता प्रथमच हे विद्यार्थ्यांसाठी संमेलन घेत आहोत अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा सौ. वृंदा कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यानी दि. २२ व २३ डिसेंबर शुक्रवार व शनिवार रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, प्रकाशक, संपादक मदन हजेरी हे उपस्थित राहाणार आहेत. अनेक बाल वाङ्मय लेखकांची उपस्थिती असणार आहे.

शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत श्री देव जैतीर देवस्थान ते श्री शिवाजी हायस्कूल तुळस अशी ग्रंथदिंडी असेल. ग्रंथदिंडीत मराठी भाषेच्या गौरवपर काव्यपंक्तींचे फलक असतील. पारंपारिक वेषातील स्त्री पुरूष व विद्यार्थी असतील. झांज पथक, ढोलपथक, लेझिमपथक अशी विविध पथके ग्रंथदिंडीची शोभा वाढवतील.

शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी बाल साहित्य संमेलन च्या मुख्य दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांचे व अध्यक्षांचे मार्गदर्शन होईल. 'कवितेच्या गावा' या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कार्यक्रमात प्रस्थापित कवीनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कवितांचे विद्यार्थ्यानी केलेले सादरीकरण होईल. यानंतर दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत भोजन , विश्रांती व परस्पर ओळखी होतील. ३.००ते ३.२० या वेळेत 'कथाकथनाची दशसूत्री व कथाकथन'* होईल. ३.२० ते ४.१० या वेळेत 'लेखक आपल्या भेटीला' या कार्यक्रमांतर्गत मान्यवर लेखकांशी विद्यार्थ्यांच्या गप्पांचा कार्यक्रम होईल. ४.१० ते ५.०० या वेळेत समारोपाच्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण , अध्यक्षीय समारोप होईल.

'नवांकूर' बालकुमार साहित्य संमेलनाचे औचित्य साधून संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमा अगोदर विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध व कथाकथन स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. वक्तृत्व स्पर्धा दोन गटात आयोजित केलेली असून इ.पाचवी ते सातवी (लहान गट) आणि इ.आठवी ते दहावी हा (मोठा गट) असे गट आहेत. दोनही गटांसाठी विषय माझा आवडता लेखक किंवा कवी असा असून वक्तृत्व स्पर्धेसाठी सादरीकरणासाठी लहान गटासाठी किमान ०४ मि. तर कमाल ०५ मि. तर मोठ्या गटासाठी किमान ०५ मि. तर कमाल ०६ मि. वेळ असेल.

निबंध स्पर्धाही इ.आठवी ते दहावी या गटासाठी असून निबंध स्पर्धेचा विषय 'मला आवडलेले पुस्तक' असा असून निबंध किमान ५०० शब्दात कागदाच्या एका बाजूवर सुवाच्च स्वःहस्ताक्षरात लिहून दि.१९ डिसेंबर २०२३ पर्यंत साप्ताहिक किरात, बॅ.खर्डेकर रोड, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत किंवा हाती द्यावेत. कथाकथन स्पर्धा (इ.आठवी ते दहावी) गटासाठी असून स्पर्धेसाठी कोणतीही मराठीतील एक कथा पाच मिनिटात कथन करायची आहे.वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता श्री शिवाजी हायस्कूल, तुळस (कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभगृह) येथे संपन्न होईल.

सर्व स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम ₹ ७७७, ₹५५५, ₹३३३,₹२२२,₹१११ व प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.सर्व स्पर्धेसाठी स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किंवा ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.विविध स्पर्धा,गप्पा, चर्चा, लेखन, सादरीकरण अशा विविध मार्गानी मुले साहित्याचा आस्वाद घेतील. ज्ञानाची, मनोरंजनाची, विचारांची, भावनांची, प्रेरणांची विविधरंगी फुले विद्यार्थ्यांवर उधळली जाणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यानी यात सहभागी होऊन संमेलनातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन आनंद यात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचे तर्फे वृंदा कांबळी यांनी केले आहे केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # vengurla #
Next Article