डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आज राष्ट्रीय टास्क फोर्सची बैठक
कारवाई तीव्र : विविध तज्ञांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलकाता येथील बलात्कार-हत्या प्रकरणानंतर डॉक्टरांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले असून सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही वेगाने पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाची पहिली बैठक मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता बोलावण्यात आली असून त्यात तज्ञ डॉक्टर आपले मत मांडतील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 14 सदस्यीय टास्क फोर्सच्या स्थापनेबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार टास्क फोर्ससाठी सर्वोच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेल्या तज्ञ आणि डॉक्टरांचे मत विचारात घेतले जाणार आहे. आज मंगळवारी होणाऱ्या बैठकीत विविध डॉक्टर, वैद्यकीय आणि निवासी डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत. तसेच ऊग्णालयातील सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल. सद्यस्थितीत सुधारणा कशी करता येईल हेही ठरवले जाणार असून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कोणते ठोस उपाय योजले पाहिजेत, याबाबत शिफारशी सुचविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही टास्क फोर्स तीन आठवड्यात अंतरिम अहवाल आणि दोन महिन्यांत अंतिम अहवाल सादर करेल. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनीही अलिकडेच अनेक डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करून त्यांची मते ऐकून घेतली आहेत. त्या सूचनांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.
सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न
आरोग्य मंत्रालयाने ऊग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत अनेक आदेश जारी केले आहेत. मंत्रालय बैठकीतील सर्व सूचनांवर विचार करेल आणि पहिल्या बैठकीत प्रत्येक पैलूंवर चर्चा केली जाईल. देशातील प्रत्येक ऊग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण कसे उपलब्ध करून देता येईल. तसेच उणिवा ओळखून त्या कशा दूर करता येतील हे आरोग्य मंत्रालयासमोरील सर्वात मोठे लक्ष्य आहे. टास्क फोर्स आपला कृती आराखडा तयार करेल आणि त्याच्या आधारे ऊग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये मोठे बदल सुरू होतील.