राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ‘गोमेकॉ’ला ‘ग्रीन सिग्नल’
एमबीबीएसच्या जागा वाढ करण्यास दिली मान्यता
पणजी : दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्याबाबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने मैलाचा दगड पार केलेला आहे. अजूनही वैद्यकीय सेवा उच्चप्रतीच्या मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ‘गोमेकॉ’ला ‘ग्रीन सिग्नल’ देत एमबीबीएसच्या जागा वाढवण्यास मान्यता दिली आहे. 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी आम्हाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून परवानगीचे पत्र प्राप्त झाले असून, एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय प्रशासनाने दिली. गोमेकॉची क्षमता वाढवण्याच्या दिशेने आणि अधिक विद्यार्थ्यांना पाठपुरावा करण्यास अनुमती देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही सांगण्यात आले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक पदव्युत्तर एमडी / एमएस अभ्यासक्रमांमध्ये जागा वाढीची मंजुरी मिळाल्याने आसन क्षमतेतील ही वाढ वैद्यकीय उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी आणि प्रदेशात आणि त्यापलीकडे वाढत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय संस्थेवर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत. आगामी शैक्षणिक वर्षात आमच्या नवीन तुकडीचे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गोमेकॉच्या वाढत्या प्रगतीसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे योगदानही बहुमूल्य आहे, असे गोमेकॉचे वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.
मान्यतेनंतर अशा वाढणार जागा...
- एमडी रेडियोडायग्नोसीस 6 जागेवरून 7 जागा (1 जागा वाढ)
- एमएस जनरल सर्जरी 6 वरून 15 जागांपर्यंत (9 जागांची वाढ)
- एमएस प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ञ 6 जागांवरून 8 जागांपर्यंत (2 जागांची वाढ)
- एमडी फार्माकोलॉजीस्ट 4 जागांवरून 6 जागा (2 जागांची वाढ)
- एमडी पेडियाट्रिक्स 7 जागांवरून 10 जागा (3 जागांची वाढ)
गोमेकॉने देशात केला आदर्श निर्माण
दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्याबाबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने देशात आदर्श निर्माण केलेला आहे. राज्यातील प्रत्येकासाठी गोमेकॉ इस्पितळ हे योगदान देत आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने एमबीबीएस जागा वाढीसाठी दिलेली मान्यता ही गोमेकॉच्या दर्जेदार सेवेचा पुरावा आहे. गोमेकॉ इस्पितळातील प्रत्येक घटकाचे उत्तम सेवेसाठी योगदान आहे. दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा इस्पितळांमध्येही दर्जेदार सेवा देण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही.
- आरोग्यमंत्री विश्वजित राणे