मणिपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग मोकळा
कुकी समुदायाची मान्यता, शांततेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल, केंद्र सरकारच्या प्रयत्नाला यश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेली चार वर्षे मैतेयी आणि कुकी समुदायांच्या संघर्षात होरपळून निघत असलेल्या मणिपूर राज्यात शांतता प्रस्थापनेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. येथील कुकी समुदायाने राष्ट्रीय महामार्ग-2 मोकळा करण्यास मान्यता दिली आहे. तसा करार केंद्र सरकारसमवेत तरण्यात आला आहे. बऱ्याच काळापासून या मार्गावरील वाहतुकीला या समुदायाच्या संघटनांकडून अडथळा करण्यात येत होते. आता या संघटनांनी एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याने या महामार्गावरुन वाहतूक सुरळीत होणार आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने प्रयत्न केले होते. ते आता यशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहेत. या संबंधात देशाची राजधानी दिल्लीत केंद्र सरकार आणि कुकी संघटनांचे नेते यांच्यात सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा गेले तीन दिवस होत होती. गुरुवारी या संबंधी महत्वाचा तोडगा काढण्यात यश आले असून राष्ट्रीय महामार्ग-2 वरुन वाहतूक सुरळीत केली जाईल, असे या करारात नमूद करण्यात आले आहे. या करारामुळे आता या महामार्गावरुन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अखंड होणार असून त्यामुळे ईशान्य भारतातील सर्व राज्यांमधील टंचाई दूर होणार आहे.
सीमेसंबंधीही करार
मणिपूर राज्याच्या सीमा निर्धारीत करणाऱ्या कराराचेही पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ही राज्यातल्या विविध जनसमुदायांची मागणी होती. हा करार ‘सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स या नावाने ओळखला जातो. तो त्रिपक्षीय करार आहे. भूमीविषयक नियमांसंबंधींची तरतूदही गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या करारात आहे. यामुळे अनेक स्थानिक जमातींना महत्वाचा दिलासा मिळणार आहे.
या नव्या कराराच्या अंतर्गत कुकी समुदाय संघटनांच्या राष्ट्रीय फेडरेशनने दंगलग्रस्त भागातल्या आपल्या छावण्या काढून घेण्यास मान्यता दिली आहे. या छावण्या आता संघर्षपिडीत भागापासून बऱ्याच अंतरावर उभ्या करण्यात येणार आहेत. यामुळे दंगलग्रस्त भागात झालेला शस्त्रास्त्रांचा सुळसुळाट नियंत्रणात येण्यास साहाय्य होणार आहे. पीपल्स फ्रंट या संघटनेनेही आपल्या छावण्या संघर्षग्रस्त भागांमधून काढून घेण्यास मान्यता दिल्याने हा प्रश्न आणखी सुकर झाला आहे.
छावण्यांची संख्याही कमी होणार
या कराराच्या अंतर्गत असेही ठरविण्यात आले आहे, की कुकी संघटना आपल्या छावण्यांची संख्याही कमी करतील. त्यामुळे विविध समाजांमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, तो कमी होण्यास साहाय्य होणार आहे. या छावण्यांमध्ये कुकी समुदारांच्या सशस्त्र हस्तकांचे वास्तव्य होते. आता या छावण्या कमी होणार असल्याने या भागात शांतता निर्माण होण्यास योग्य परिस्थिती निर्माण होईल.
शस्त्रेही खाली ठेवणार
कुकी समुदायाच्या संघटना आपली शस्त्रेही खाली ठेवणार आहेत. सीआरपीएफ आणि बीएसएफच्या नजीकच्या छावण्यांमध्ये ही शस्त्रे जमा केली जातील. यामुळे या भागात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षितेसाठी योग्य ती परिस्थिती निर्माण होईल. हा करार मणीपूरच्या शांततेसाठी अत्यंत कळीचा असून सर्व संबंधित संघटना या कराराचे योग्य प्रकारे आणि मनापासून पालन करतील, अशी अपेक्षा केंद्र सरकारकडून या करारानंतर व्यक्त झाली आहे.
अडीचशे नागरीक ठार
मणिपूरमध्ये 2023 मध्ये मैतेयी आणि कुकी या संघटनांमध्ये सशस्त्र संघर्षास प्रारंभ झाला होता. तेथील न्यायालयाने मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्या, असा निर्णय दिला होता. तो अमान्य झाल्याने कुकी आणि इतर जनजातीय समुदायाला मान्य नसल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. ही संघर्षमय परिस्थिती दोन वर्षे टिकून होती. या कालावधीत मैतेयी आणि कुकी अशा संघर्षात किमान 260 नागरीकांचा बळी घेण्यात आला होता. गुरुवारी झालेल्या करारामुळे हे दोन समाज यापुढे सहकार्याने आणि शांततेत राहतील आणि राज्यात दंगली होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त नागरीकांनी व्यक्त केली आहे.