राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतूक पूर्वपदावर
कारवार : येथील काळीनदीवरील जुना पूल कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येवू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग 66 वरील सदाशिवगड आणि कारवार दरम्यानचा सुमारे 1 किलो मी. लांबीचा जुना पूल मंगळवारी रात्री अचानकपणे कोसळला होता. या दुर्घटनेत गोव्याहून हुबळीकडे निघालेली ट्रक काळी नदीत कोसळून ट्रक चालक जखमी झाला होता. जुना पूल कोसळल्यामुळे गोवा-कारवार, बेळगाव-कारवार दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. तथापि, बुधवारी दहावीची वार्षिक परीक्षा (तिसरी) आणि पदवी महाविद्यालयाच्या परीक्षा असल्याने सदाशिवगडहून कारवारला जाणाऱ्या लघु वाहनांना परवानगी देण्यात आली होती. तथापि अवजड वाहनांना सदाशिवगड येथे रोखून धरण्यात आले होते.
खबरदारीचा उपाय म्हणून कारवारहून सदाशिवगडकडे येणाऱ्या अवजड वाहनांना कोडीबाग येथे रोखून धरले होते. दरम्यान या दुर्घटनेबद्दल जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार आणि काळीनदीवर नवीन पूल बांधलेल्या व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे रुंदीकरण करण्याच्या आयआरबी बांधकाम कंपनीवर प्रकरण दाखल केले आहे. याशिवाय जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांनी एनएचआय आणि आयआरबी कंपनीला नोटीस बजावून नवीन पुलाची पाहणी करून वाहतूक समस्येबद्दल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने फिटनेस प्रमाणपत्र तातडीने देण्याची सूचना केली होती.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयआरबी कंपनीच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी गुरूवारी दोन्ही पुलांची पाहणी केली. कोसळलेल्या पूलाची कसून पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांनी हा पूल बांधताना वापरण्यात आलेल्या साहित्याची पाहणी केली. जुना पूल नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जुना पूल कोसळल्याने नवीन पुलाला समांतर आणखी एक पूल बांधण्याची गरज आहे. जुन्या पुलाचा वार करूनच आणखी एक पूल तयार करायचा की, अन्य एक नवीन पूल तयार करायचा याबद्दलही चर्चा केल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नवीन पुलाची पाहणी केली.
लेखी स्वरुपात देण्याची मागणी
नवीन पुलाची पाहणी केल्यानंतर एनएचएआय आणि आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नवीन पुलाची पाहणी करून या पुलावरुन दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याची मौखिक परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांनी अधिकारी जोपर्यंत परवानगी लेखी स्वरुपात देत नाहीत. तोपर्यंत नवीन पुलावरुन वाहतूक सुरू न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात परवानगी दिल्यानंतर नवीन पूलावरुन सर्व वाहनांना ये-जा करण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पूलांच्या सुरक्षितेबद्दल अहवाल देण्याची सूचना
अंकोला तालुक्यातील शिरुर येथील आणि काळी पूल दुर्घटनेमुळे जिल्हाप्रशासनासमोर फार मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही दोन्ही प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जिल्हा पंचायतीच्या मासेमारी खात्याच्या ग्राम पंचायतीसह सर्वरस्त्यावरील पूलांच्यासुरक्षितेचा आढावा घेवून अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. एखादे पूल धोकादायक असल्याचे दिसून आल्यास पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्याची सूचना पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
माजी मंत्री देशपांडे यांची प्रतिक्रिया
प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी काळी पूल दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग 66 वरील काळी नदीवरील जुना पूल कोसळणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पूल रात्रीच्यावेळी कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्हावासीय हेराण झाले आहेत. यामध्ये आणखी एका संकटाची भर पडली आहे. गोवा आणि कर्नाटक दरम्यानचा दुवा असलेला हा पूल कोसळल्याने जिल्ह्यातील पर्यटन उद्योगांसह अन्य क्षेत्राची हानी होणार आहे. जिल्ह्dयात अनेक पूल आहेत. सर्व पूलाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घेतली पाहिजे. काळी नदीवरील नवीन पूलावर वाहतुकीचा ताण पडू नये म्हणून आणखी एक पूलाची उभाणी होणे गरजचे आहे, असे देशपांडे हे म्हणाले.
त्या ट्रक चालकाला वाचविलेल्या स्थानिक मासेमारी बांधवांचे कौतुक
मंगळवारी रात्री काळी नदीवरील पूल कोसळल्यानंतर ट्रक नदीत पडला होता. त्याची माहिती मिळताच घटनास्थळी अळवेवाडा येथील सुरज गोपीनाथ सारंग, करण, राजेंद्र नावगे, सुदेश विठोबा सारंग, लक्ष्मीकांत देवीदास मेहता आणि दिलीप देवीदास मेहता या मासेमारी बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून ट्रक चालकाचा जीव वाचविला. त्याबद्दल त्या मासेमारी बांधवांचे सर्वच थरातून कौतुक करण्यात येतआहे. या मासेमारी बांधवांना पोलीस कर्मचारी अशोक दुर्गेकर आणि सुदर्शन तांडेल यांनी मदत केली.