राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील बोगदे वाहतुकीला खुले करा
कारवार तालुक्यातील वाहनधारकांची मागणी : वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
कारवार : येथून जवळचे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील बोगदे वाहतुकीला केव्हा खुले करणार असा सवाल कारवार तालुकावासिय जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवार-अंकोलाचे आमदार सतेश सैल आणि जिल्हा प्रशासनाकडे करीत आहेत. कारवार नगराचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतिहास प्रसिध्द लंडन पुलाजवळ कारवार आणि बिणगाच्या दरम्यान दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यांचे बांधकाम आयआरबी या कंपनीकडून करण्यात आले असून, बोगद्यांच्या निर्मितीसाठी कोट्यावधी ऊपये खर्च करण्यात आले आहेत. या बोगद्यामुळे कारवार आणि बिणगा दरम्यानचे अंतर काही किलोमीटर कमी झाले असून बोगद्यामुळे प्रवास सुखकर आणि निर्धोक झाला आहे. कारण पूर्वीच्या कारवार आणि बिणगा दरम्यानचा व्हाया बैतखोल रस्ता जीवघेण्या वळणाचा होता. याशिवाय जुन्या रस्त्याच्या बाजूलाच कारवार वाणिज्य बंदर असल्याने त्या रस्त्यावरील वाहतुकीत व्यत्यय येत होता. राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वरील बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशी सुखावले होते. दोनपैकी एका बोगद्याचे उद्घाटन कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या हस्ते तर दुसऱ्या बोगद्याचे उद्घाटन आमदार सतेश सैल यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तथापि हा आनंद अधिककाळ टिकला नाही. कारण पावसामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वाराला धबधब्यांचे स्वरूप प्राप्त झाले. शिवाय बोगद्यामध्ये ठिकठिकाणी गळती सुरू असल्याचे दिसून आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीच्या बांधकाम गुणवतेबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या.
अगोदरच कंपनीकडून होत असलेल्या कामाबद्दल अनेक आरोप आणि तक्रारी केल्या जात होत्या. आता त्यात बोगद्याच्या निकृष्ट कामाची भर पडली. त्यामुळे जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बोगद्यातून होणारी वाहतूक बंद ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर आयआरबी कंपनी बोगद्यासंदर्भात जोपर्यंत फिटनेस प्रमाणपत्र सादर करीत नाही. तोपर्यंत बोगद्यातून होणारी वाहतूक पूर्ववत होणार नाही असे सांगितले. शिवाय आयआरबी कंपनीला धडा शिकविण्यासाठी कंपनीने टोल घेऊ नये असे सांगितले. तथापि कंपनीकडून टोल केवळ एक दिवस गोळा करण्यात आला नाही. पण बोगदा मात्र अद्यापही बंद ठेवण्यात आला आहे. आयआरबी कंपनीने फिटनेस प्रमाणपत्र देऊनही बोगदे वाहतुकीला खुले न केल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पण बोगद्यातील वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह कारवार तालुक्यातील दक्षिण भागातील नागरिकांना याचा फार मोठा फटका बसत आहे. जुन्या रस्त्यावरील वाहतुकीत वाढ झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच बिणगासह परिसरातील नागरिक बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याची मागणी पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासनाकडे करीत आहेत.