उत्तराखंडात राष्ट्रीय खेळांना थाटात प्रारंभ
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंडचा धार्मिक वारसा आणि जैवविविधतेचे दर्शन घडविणाऱ्या रंगीबेरंगी उद्घाटन समारंभाने मंगळवारी येथे 38 व्या राष्ट्रीय खेळांना सुऊवात झाली. सुमारे 10 हजार खेळाडू या क्रीडास्पर्धेत सहभागी झाले असून 32 प्रकारांतील पदके पटकावण्याच्या दृष्टीने स्पर्धा करण्यास ते सज्ज झाले आहेत.
हे खेळ 14 फेब्रुवारीपर्यंत चालतील आणि डेहराडून हे त्याचे मुख्य ठिकाण राहील. या डोंगराळ राज्यातील सात शहरांमध्ये स्पर्धा आयोजिण्यात येणार असून सुमारे 450 सुवर्णपदके आणि तितकीच रौप्य आणि कांस्यपदके पणाला लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह या खेळांचे उद्घाटन केले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये थंड हवामान असूनही हा समारंभ पाहण्यासाठी अंदाजे 25,000 प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पंतप्रधानांनीच यापूर्वीच्या 2022 (गुजरात) आणि 2023 (गोवा) मधील राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले होते.
सजविलेल्या गोल्फ कार्टवरून स्टेडियमची फेरी मारल्यानंतर मोदींना पारंपरिक टोपी, शाल आणि खेळांचा शुभंकर ‘माऊली’ तसेच पदकांच्या प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांची यावेळी उपस्थिती होती. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे प्रमुख ख्रिस जेनकिन्स यांची देखील या समारंभाला उपसिथ्ती लाभली. उपस्थित होते. राष्ट्रीय खेळांच्या आयोजनाला उत्तराखंडच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. कारण हे राज्य त्याच्या निर्मितीचे 25 वे वर्ष साजरे करत आहे.ा