राष्ट्रीय लोकशाही आघाडी की विरोधक ?
बिहार विधानसभा निवडणूक मतगणना होणार आज
वृत्तसंस्था/पाटणा (बिहार)
बिहार विधानसभा निवणुकीची मतगणना आज शुक्रवारी होत आहे. बिहारमध्ये पुढचे सरकार कोणाचे असणार, याचा निर्णय या मतगणनेतून होणार आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा विजयी होणार, की विरोधी महागठबंधनला यश मिळणार, याचा निर्णय आज शुक्रवारी रात्रीपर्यंत होणार आहे. बिहारमध्ये 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये विधानसभेच्या 243 स्थानांसाठी मतदान झाले आहे. बिहारच्या मतदारांनी मतदानाला भरघोस प्रतिसाद देऊन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून 66.91 टक्के मतदान झाले असून हा 1951 पासूनचा उच्चांक आहे. महिलांनी प्रचंड प्रमाणात मतदान केले असून त्यांच्या मतदानाची टक्केवारी 71 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर पुरुषांनी 62 टक्क्यांहून अधिक मतदान केलेले आहे. महिलांचे हे मोठे मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष
मंगळवारी मतदानाचा द्वितीय टप्पा पूर्ण झाल्यानंतर अनेक सर्वेक्षण संस्थांनी त्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच विजय मिळेल असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. मात्र, प्रत्येक सर्वेक्षणातील संख्या भिन्न भिन्न आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 121 ते 209 जागा मिळतील, असे अनुमान या सर्वेक्षणांमधून व्यक्त करण्यात आले आहे. महागठबंधनला 34 ते 118 जागा मिळतील, असे दिसून येत आहे. तथापि, अनेकदा मतदानोत्तर सर्वेक्षणांची अनुमाने आणि निष्कर्ष चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे आज शुक्रवारी मतगणना पूर्ण झाल्यावर जे संख्याबळ समोर येईल, तेच खरे असेल. हेच संख्याबळ पुढील पाच वर्षांसाठी बिहारचे भवितव्य निर्धारित करणार, हे निश्चित मानले जात आहे.
मतगणनेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. प्रत्येक मतगणना केंद्रावर कडेकोट सुरक्षा ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतगणना स्थानांवर वाजवी पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमू नये, म्हणून नियमावली लागू करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांमधील निर्णय हाती येण्यासाठी रात्रीचे किमान 10 वाजतील अशी शक्यता आहे. सर्व पक्षही मतगणनेसाठी सज्ज आहेत.
चुरशीचा संघर्ष अपेक्षित
मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष काहीही असले तरी, निवडणूक काळात ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी पक्ष आणि आघाड्यांकडून प्रचार करण्यात आला, तो पाहता संघर्ष चुरशीचा होईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मुख्य स्पर्धा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात आहे. दोघांनीही त्यांच्या-त्यांच्या विजयाची भाकिते केली आहेत. पण, विजयमाला कोणत्या तरी एकाच्याच गळ्यात पडणार, हेही स्पष्ट आहे. प्रत्येक पक्षाने मतगणना केंद्रांवर उपस्थित राहण्यासाठी आपले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांची निवड केली आहे.
आश्वासनांचा वर्षाव
या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्ध्यांकडून मतदारांवर आश्वासनांचा भडिमार करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकीपूर्वीच बिहारमधील जवळपास दीड कोटी महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. प्रत्येक घराला 125 युनिटस् प्रतिमहीना वीज विनामूल्य देण्यात येत आहे. त्याखेरीच पुन्हा निवडून आल्यास आणखी सुविधा दिल्या जाणार आहेत. तर महागठबंधनने प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी दिली जाईल, हे आश्वासन दिले आहे. मतदारांनी त्यांची निवड यंत्रबंद केलेली आहे.
बिहारसह देशभरात उत्कंठा शिगेला
- निवडणुकीचा निर्णय काय लागणार, याकडे बिहारसह देशाचे आहे लक्ष
- दोन्ही प्रतिस्पर्धी आघाड्यांकडून त्यांच्या-त्यांच्या यशाचा विश्वास व्यक्त
- मतगणनेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज, सर्व केंद्रांवर मोठी सुरक्षा