नाथ संप्रदायी संत कवी : सोहिरोबा आंबिये
निसर्ग सुंदर गोव्यात पंच महाभूतांतून दिव्यत्त्वाची प्रचिती घेतलेली असली तरी कालांतराने लोकधर्मातून इथल्या आध्यात्मिक वारशाची शेकडो वर्षांपूर्वी अभिवृद्धी झाली. भारतभरातल्या शिवपूजनाच्या परंपरेतून उद्गम पावलेल्या मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाचा प्रसार केला. गोवा-कोकणातल्या नाथ संप्रदायाचा वारसा अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मूळ गोमंतकीय आणि कुळकर्णीपणामुळे तेरेखोल नदीकिनाऱ्यावरच्या बांदा म्हणजेच एलिदाबाद शहरात स्थानिक झालेल्या सोहिरोबा आंबिये यांनी आपल्या शब्दमाधुर्य आणि प्रासादिक काव्य रचनांद्वारे केले. सोळाव्या शतकात सासष्टी महाल पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर स्थापन केलेल्या धर्मसमीक्षण संस्थेने धार्मिक छळवणुकीचा जेव्हा कहर गाठला तेव्हा झुआरी नदी काठी राहणाऱ्या संझगिरी कुटुंबियांनी अरबी सागर आणि तेरेखोल नदीच्या कुशीत वसलेल्या भूमका-वेताळाच्या पालयेत वास्तव्य केले. आम्रवृक्षांच्या सावलीत राहणारे संझगिरी पालयेत आंबिये म्हणून नावारुपाला आले.
1543 साली कोलवाळ नदीच्या डाव्या किनाऱ्यावरचा बार्देस प्रांत पोर्तुगीज सत्तेखाली आला. परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या ताब्यात पेडणे महाल असल्याने संझगिरी कुटुंबियांनी पालयेत स्थायिक होण्यास प्राधान्य दिले. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवशाहीत्व असलेल्या महालांवरती पोर्तुगीजांनी ताबा मिळविण्यासाठी संघर्ष आरंभल्याने आंबिये कुटुंबाने बांद्यात स्थायिक होऊन, सावंतवाडकर संस्थानातल्या या परिसरातल्या कुळकर्णीपणाची जबाबदारी स्वीकारली. याच बांद्यात 1714 साली सोहिरोबा आंबियेचा जन्म झाला. भक्तीविजय, हरिविजय, शिवलिला आदी धर्मग्रंथांच्या पारायणाच्या परंपरेमुळे बांद्यात धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांचा समाजावरती पगडा होता आणि त्यामुळे सोहिरोबांना लहानपणापासून अध्यात्माची गोडी निर्माण झाली. कुटुंबातल्या कुळकर्णीपणाच्या कामानिमित्त सावंतवाडकर राजाकडे जात असताना जंगल समृद्ध इन्सुली घाटात पिकलेल्या फणसाचे गरे खाण्यास थांबले असता, सोहिरोबांना सिद्ध पुरुषाकडून गुरुपदेश लाभला आणि आत्मसाक्षात्कार झाला. विवाहबद्ध असूनही सांसारिक सुखाविषयीची आसक्ती दुर्बल होत गेली. कुळकर्णीपणाच्या जबाबदारीतून विमुक्त होऊन, त्यांनी ध्यानधारणा, भगवद्भक्ती, आध्यात्मिक वाचन, मनन आणि चिंतनात लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळेच त्यांच्या ओठांवरती प्रासादिक आणि संस्कृतप्रचुर पद्यरचना जन्माला आली. संस्कृत श्लोकातून निर्माण झालेल्या सिद्धांत संहितेवर त्यांनी स्वत:ची टीका मराठीत करण्याची पद्धत रुढ केली. अक्षयबोध, अद्वयानंद, पूर्णाक्षरी, महद्नुभवेश्वरी, सोहिरोबांची बखर आदी ग्रंथांबरोबर त्यांनी श्लोक, अभंग, आरत्यांची निर्मिती करून तत्कालीन समाजात भारतीय धर्म आणि संस्कृतीची ध्वजा अविरतपणे फडकत ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या पद्यरचनांतून गोरक्षनाथांचा जसा वारंवार उल्लेख आढळतो, त्याचप्रमाणे ‘गैबीप्रसादे गैबीची झाले’ असा संदर्भ मिळतो.
हरिभजनाविण काळ घालवू नको रे।।
दोरीच्या सापा भिवुनी भवा।
भेटी नाही जिवा-शिवा।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे।।
मराठी संत-महंतांनी सर्वसामान्य जनतेला शेती-बागायतीच्या कामात रमण्याबरोबर आपली नाळ धार्मिक संस्कारांशी घट्ट राहिली पाहिजे म्हणून भगवद्भक्तीला जे प्राधान्य दिले त्याचे अनुबंध सुदृढ करण्याच्या दृष्टीने सोहिरोबांनी कोकणात अर्धशतकाहून अधिक काळ व्यतित केल्यावर 1774 साली उत्तर भारतातल्या तीर्थक्षेत्री यात्रा आरंभली. ग्वाल्हेर संस्थानच्या मानसन्मानाचा आदर ठेवताना, त्यांनी सुखलोलुपतेत वास्तवाकडे दुर्लक्ष केले नाही आणि म्हणून - अवधूत नहीं गरज तेरी। हम बेपर्वा फकिरी। सोना-चांदी हमको नहीं चाहिए। अलख भुवन के वासी।। असे निर्भिडपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात होते. मराठी भाषेत सुरस पद्यरचना करणाऱ्या सोहिरोबांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांतल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आणि तेथील समाजाला भगवद्भक्तीची ओढ लागावी म्हणून हिंदी, गुजराती भाषांतही मधुर पद्यरचना निर्माण केली. वार्धक्याची छाया माणसाला जेव्हा भेडसावू लागते, तेव्हा कौटुंबिक सुखाचा विळखा सहज सोप्यारितीने सोडविणे कठीण असते आणि त्यासाठी ओठावरती देवाचे मंगलमय नामस्मरण गरजेचे असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यासाठी ते म्हणतात -
म्हणे सोहिरा आयुष्य सरते।
हे तुला न स्मरते। राहू नको बेकाम।
घे हरघडी हरिचे नाम।।
त्यांनी आपल्या आयुष्यात जी ग्रंथनिर्मिती केली, पद्यरचना रचली, त्याचा स्थायिभाव अध्यात्म आणि भक्ती असले तरी त्याची मांडणी करताना त्यांनी साध्या-सोप्या भाषेचा आणि सर्वसामान्यांना जीवन जगण्याचा अर्थ समजावा, या हेतूचे काटेकोरपणे पालन केलेले पाहायला मिळते. भारतीय वैदिक परंपरा आणि उपनिषदातले तत्त्वज्ञान त्यांना भावले आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या एकंदर साहित्यावरती झालेले आपणाला पाहायला मिळते.
दिसणे ते सरले। अवघे प्राक्तन हे मुरले।।
आलो नाही गेलो नाही। मध्ये दिसणे हे भ्रांती।।
याची त्यांना जी प्रचिती आयुष्य जगताना आली त्याचा प्रत्यय सोहिरोबांच्या पद्यरचनांतून अनुभवायला मिळतो. वैशाखातल्या पौर्णिमेला त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यासाठी त्या दिवसाला इन्सुली आणि परिसरातले भाविक भक्ती उत्सव साजरा करतात. बांद्यातून उत्तर भारतातल्या तीर्थक्षेत्री गेल्यावरती त्यांनी सुमारे अठरा वर्षे अध्यात्म आणि भक्तीची धारा समाजात पोहोचविण्यासाठी गेयतापूर्ण पद्यांची रचना केली. प्रपंचाचा मोहपाश, पैसा, धन-दौलत याविषयीचा स्वार्थ त्यांनी झटकून दिला. त्यामुळे जेव्हा आपले शरीर थकत चालले आणि चिदानंदाची हाक कानी पडली, तेव्हा भारावलेल्या अवस्थेत त्यांनी मठाचा त्याग केला, तो चैत्र शुद्ध नवमीला.
मधुमासाच्या नवम दिनी। सगुण स्वरुपी निर्गुण केले। अनुभव हरले स्वरुप कळे।।
याच पद्यरचनेतून त्यांनी क्षीप्रा नदीकाठावरती वसलेल्या मठाचा कायमचा निरोप घेतला आणि त्यानंतर त्यांचे काय झाले, याचा कोणाला पत्ता लागला नाही. पेडणेतल्या पालये गावातले आंबिये कुटुंबीय बांद्यात स्थायिक झाले तरी गोमंतकातल्या शब्दकळेला ते विसरू शकले नाहीत, याचा प्रत्यय त्यांच्या पद्यरचनेतून येतो. पंडित जितेंद्र अभिषेकींच्या सुरेल गायनाने अजरामर झालेल्या गाण्यातून गोमंतकीय शब्दकलेची जाणीव होते.
आम्ही नहों हो पांचातले। नहो पंचविसातले।
एवढ्यालाही वळखोनिया वेगळे आम्ही आतले।।
कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘तुकाराम महाराजांचा निस्पृह बाणा, एकनाथ महाराजांची निवैरता आणि ज्ञानोबारायांचा योगानुभव आणि अद्वैत दर्शन यांचा त्रिवेणी संगम सोहिरोबांच्या चरित्रात झालेला आहे.’ नाथ संप्रदायाची परंपरा समृद्ध करण्याचे कार्य सोहिरोबांनी आपल्या जीवन कार्यातून केलेले आहे.
- राजेंद्र पां. केरकर