For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नासल्या ललाटीच्या रेषा!

06:55 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
नासल्या ललाटीच्या रेषा
Advertisement

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.... असे या मराठीभूमीचे गोविंदाग्रज यांनी केलेले वर्णन ऐकताना छाती अभिमानाने फुलून येते.... गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा... हे वर्णन सुखावून जाते....पण, आता महाराष्ट्राच्या या ललाटीच्या रेषा म्हणजे इथल्या नद्या, पुरत्या नासल्या आहेत... त्यांचे मांगल्य आणि पावित्र्य नष्ट करण्यात जाणतेपणी किंवा अजाणतेपणी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक सहभागी होतो आहे.  देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या या महाराष्ट्रात आहेत! देशभरात 603 पैकी 311 म्हणजे निम्म्याहून अधिक नद्या प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मिठी नदी, मुळा, मुठा, सावित्री, भीमा या नद्या अधिक प्रदूषित ठरल्या आहेत. यामागे त्या ज्या नागरी भागाच्या जवळ आहेत त्या पुणे आणि मुंबई सारख्या पट्ट्याचा दोष आहे. भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, बेसुमार नागरीकरण, औद्योगिकीकरण, त्यांच्यासाठी होणारे तितकेच भरमसाठ उत्पादन, त्यासाठी वापरले जाणारे पाणी, रासायनिक वस्तूंचा वापर आणि प्रदूषित, रसायनयुक्त तसेच मलमूत्रयुक्त सांडपाणी  पुन्हा गटारी किंवा भुयारी गटारीच्या रूपाने नदीतच येऊन मिसळल्याने या नद्यांचे स्वरुप गटारींसारखेच झाले आहे. दुर्दैवी असले तरी ते सत्य आहे आणि ते माहीत असूनही केवळ अहवाल तयार करण्यापलीकडे सरकार नावाच्या यंत्रणेला यापूर्वीही काही करता आलेले नाही आणि यापुढे काही करतील असे आज तरी दिसत नाही. भविष्यात कधीतरी पाण्याची फारच कमतरता भासली तर या पाण्यावर प्रक्रिया सुरू होईल. या व्यतिरिक्त प्रदूषणाचा गांभीर्याने विचार होणार की नाही, हा आजच्या समाजासमोरचा खूप मोठा प्रश्न आहे. पण त्यावर बोलायचेच नाही असे जणू सरकार आणि जनता दोघांनीही ठरवून टाकले आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे, पाणी शुद्ध करून मग ते सोडणे आणि दूषित पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे याकडे दुर्लक्ष होते. त्यापेक्षा सोपा मार्ग, सगळेच नदीत सोडून नदीचे वाटोळे करणे, सर्वांना आवडतो. सरकारलाही डोळेझाक करणे आवडते. त्या बदल्यात अहवाल प्रसिद्ध केले की त्यांचे काम झाले!  यापूर्वी दिल्लीतील हवा सर्वात प्रदूषित म्हटली जायची. दिल्लीशेजारी हरियाणाचे शेतकरी उसाचे पाचट जळतात म्हणून दिल्ली काळवंडली आहे असे म्हणायचे तर मुंबईचे काय? अलीकडेच मुंबईच्या हवेनेही ती पातळी गाठलेली आहे. समुद्राच्या वाफेमुळे आणि वाऱ्यामुळे मुंबईचे प्रदूषण काही प्रमाणात नष्ट व्हायचे. मात्र वाढती साधने, कारखाने, वाहने आणि इतर कारणांमुळे आता या प्रदूषणाला रोखणे निसर्गालाही अवघड झाले आहे. त्यातच ही नवीन बातमी चिंता वाढवत आहे. तसे तर प्रदूषित नद्यांचा अहवाल सांगतो की, देशातील 28 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आहेत. यात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ (!) राबवण्यात येतो. यात पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव यांचा विचार (!) केला जातो. विशेषत: पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरातील नद्यांमधील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते! यापूर्वी 2018मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित केला होता. त्यात 351 नद्यांचे काही पट्टे प्रदूषित जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील 55, मध्यप्रदेशातील 19, बिहारमधील 18, केरळमधील 18 आणि कर्नाटकातील 17 नद्यांचा समावेश प्रदूषित नद्यांमध्ये आहे. 2019 आणि 2021 यादरम्यान महाराष्ट्रातील 55 नद्यांचे 147 ठिकाणी घेतलेले नमुने प्राणवायू मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पवना आणि मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या. महाराष्ट्रातील उर्वरित नद्यांची स्थितीसुद्धा याहून वेगळी नाही. त्याही प्रदूषित आहेतच. कारण बहुतांश नद्यांमध्ये सांडपाणी आणि कारखान्यांचे पाणी मिसळतेच आहे. नदीतील जलचलांवरसुद्धा त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कृष्णेच्या पात्रात कारखान्यांच्या प्रदूषित पाण्यामुळे खिलापी नावाचा मासा वाढून तो  माणसांना खाण्यायोग्य माशांच्या प्रजाती संपवत चालला आहे. हाच मासा मगरींच्या आवडीचा असल्याने त्यांना प्रचंड खाद्य मिळून त्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मगरींचे अभयारण्य म्हणून घोषित केलेल्या या क्षेत्रात मगर आणि मानव संघर्ष वाढला आहे. भीमेला पंढरपुरात चंद्रभागा असे म्हणतात. चंद्रभागेत स्नान पुण्याचे कार्य समजले जाते. पण या चंद्रभागेतील पाण्यात साचलेले शेवाळ मलमूत्रयुक्त सांडपाण्यामुळे साचले आहे आणि त्यात उतरणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. पूर्वी याच चंद्रभागेत रोगमुक्तीसाठी लोक स्नान करायचे. आज त्या भावनेला मोठा धक्का बसला आहे. ‘जुनीपुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव रे...’ असे चंद्रभागेत उतरून पांडुरंगाला साकडे घालणाऱ्या भाविकांनी नावेत बसून चंद्रभागेत फिरायचे म्हटले तर नदीच्या मध्यावर नावाड्याला खाली उतरून शेवाळातून नावेला धक्का देत किनाऱ्यावर आणावे लागते. हे महाराष्ट्रासारख्या मंगल देशातील पवित्र नद्यांचे वास्तव आहे. नमामि चंद्रभागा किंवा कृष्णा शुद्धीकरणासारखे किती प्रकल्प झाले तरी जोपर्यंत ते मनावर घेऊन केले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या ललाटीच्या या भाग्यरेषा काठावरच्या माणसांचे आरोग्य बिघडवतच राहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.