नासाला मिळाले मंगळावर प्राचीन जीवनाचे संकेत
नासाच्या परसिवियरेन्स मार्स रोवरने मंगळ ग्रहावर एक असा शोध लावला आहे, जो आम्हाला तेथील प्राचीन जीवनाचे संकेत देणारा आहे. जेजेरो व्रेटरने एका खडकातून मिळविलेला ‘सॅफायर कॅन्यन’ नमुना प्राचीन सुक्ष्मजीवांचे (मायक्रोबियल लाइफ) संकेत देतो. हा शोध नेचर नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. जुलै 2024 मध्ये परसिवियरेन्स रोवरने मंगळाच्या जेजेरो क्रेटरमध्ये ‘ब्राइट एंजल’ क्षेत्रातील एका खडकाचा नमुना मिळविला होता. या खडकाचे नाव ‘चेयावा फॉल्स’ ठेवण्यात आले आहे. नमुन्याचे नाव सॅफायर कॅन्यन आहे. हा खडक नेरेटवा वॅलिस नावाच्या प्राचीन नदीच्या खोऱ्यात मिळाला आहे. ही नदी एकेकाळी पाण्याने भरलेली होती. या नमुन्यात ‘बायोसिग्नेचर’चे संकेत मिळाले आहेत, म्हणजेच अशा गोष्टी ज्या जीवनाशी निगडित असू शकतात. परंतु हे निश्चित करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.
बायोसिग्नेचर म्हणजे काय?
बायोसिग्नेचर असे पदार्थ किंवा संरचना आहेत, जे बहुधा जीवनाद्वारे तयार झालेले आहेत, परंतु याची पुष्टी मिळविण्यासाठी आणखी डाटा आवश्यक आहे. सॅफायर कॅन्यनमध्ये रंगबिरंगी डाग दिसले असून वैज्ञानिकांनी त्यांना ‘लेडी स्पॉट्स’ आणि ‘पॉपी सीड्स’ नाव दिले आहे. यात कार्बन, सल्फर, आयर्न आणि फॉस्फरस यासारखी रसायने मिळाली असून जी पृथ्वीवर सुक्ष्मजीवांसाठी ऊर्जेचा स्रोत असू शकतात. रोवरच्या उपकरणांनी या डागांमध्ये विशेष खनिजं शोधली, ज्यात विवियनाइट (आयर्न फॉस्फेट) आणि ग्रीगाइट (आयर्न सल्फाइड) सामील आहेत. पृथ्वीवर ही खनिजं सुक्ष्मजीवांच्या हालचालींमुळे निर्माण होतात, परंतु कुठल्याही जीवनाच्या रासायनिक प्रक्रियांशिवाय देखील त्यांची निर्मिती झालेली असू शकते.
हा शोध खास का?
नासाचे वैज्ञानिक जोएल हुरोविट्ज यांनी ब्राइट एंजलमध्ये मिळालेली रसायनं सुक्ष्मजीवांसाठी चांगला स्रोत असू शकली असती, परंतु हा खरोखरच जीवनाचा संकेत आहे का, हे आम्हाला जाणून घ्यावे लागेल असे म्हटले आहे.
प्राचीन सरोवराचा पुरावा : जेजेरो क्रेटर 3.5 अब्ज वर्षांपूर्वी एक सरोवर होते, जेथे नद्या पाणी आणत होत्या, अशी ठिकाणी सुक्ष्मजीवांसाठी उपयुक्त असतात. सॅफायर पॅन्यनचे खडक माती आणि गाळाने निर्माण झाले आहेत.
नव्या काळाचा संकेत : मंगळ ग्रहावर जीवनाच्या खुणा अत्यंत जुन्या खडकांमधून मिळतील असे पूर्वी वैज्ञानिकांना वाटत होते, परंतु ब्राइट एंजलचे खडक अपेक्षाकृत नवे असून त्यातून मंगळ ग्रहावर जीवन दीर्घकाळापर्यंत शक्य राहिले असावे असे कळते.
सर्वात मजबूत संकेत : हा मंगळावर जीवनाच्या शोधाचा आतापर्यंतचे सर्वात जवळचे पाऊल आहे. हा शोध मंगळ ग्रहाचा इतिहास समजून घेण्यास मदत करेल असे नासाचे कार्यकारी प्रशासक सीन डफी यांनी सांगितले.
कसा लागला शोध?
परसिवियरेन्स रोवर फेब्dरुवारी 2021 मध्ये जेजेरो क्रेटरमध्ये उतरले होते, याचे मिशन मंगळावर प्राचीन जीवनाच्या खुणा शोधणे आणि नमुने जमा करणे आहे. चेयावा फॉल्स हे 1 मीटर लांब आणि 0.6 मीटर रुंद तिराच्या आकाराचा खडक असून तो जुलै 2024 मध्ये मिळाला. रोवरने स्वत:च्या उपकरणांद्वारे याची तपासणी केली आणि रंगबिरंगी डाग आढळून आले. या डागांमध्ये रासायनिक प्रतिक्रियांच्या (रेडॉक्स रिअॅक्शन) खुणा मिळाल्या ज्या जीवनाशी संबंधित असू शकतात. रोवरने आतापर्यंत 27 नमुने मिळविले असून यात सॅफायर कॅन्यन सर्वात खास आहे. हा नमुना भविष्यात पृथ्वीवर आणला जाणार आहे, जेणेकरून अधिक विस्तृतपणे तपासणी होऊ शकेल. जीवनाशी निगडित दाव्यांसाठी असाधारण पुरावे हवेत, हे एक संभाव्य बायोसिग्नेचर आहे, परंतु ठोस पुरावा म्हणून पृथ्वीवर आणखी तपासणी आवश्यक असल्याचे नासाच्या वैज्ञानिक केटी स्टॅक मॉर्गन यांनी म्हटले आहे.
पुढे काय होणार?
सॅफायर कॅन्यन नमुना पृथ्वीवर आणण्याची योजना आहे. नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेच्या मार्स सॅम्पल रिटर्न योजना 2030 च्या दशकात नमुने आणण्याचा प्रयत्न करेल. पृथ्वीवर आणलेल्या नमुन्यांच्या तपासणीतून या खुणा जीवनाद्वारे तयार झाल्या आहेत की नाही हे वैज्ञानिक ठरविणार आहेत.