गयानाच्या दिग्गज क्रिकेटपटूंशी नरेंद्र मोदींनी साधला संवाद
वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन, गयाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जॉर्जटाउनमध्ये गयानाच्या प्रमुख माजी क्रिकेट खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींचा गयाना दौरा हा मागील पाच दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांनी केलेला पहिला दौरा आहे. त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा होता.
या ऐतिहासिक भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅरिबियन नेत्यांसमवेत दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत सहभागी होऊन त्याचे सहअध्यक्षपद भूषविले. या परिषदेमुळे या प्रदेशातील भारताची भागीदारी आणखी मजबूत झाली आहे. दिग्गज क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉईड, अल्विन कालीचरण, शिवनारायण चंद्रपॉल, देवेंद्र बिशू, स्टीव्हन जेकब्स आणि डॉ. रणजीसिंगी रामरूप यांचा त्यात समावेश राहिला.
भारत व गयानातील लोकांच्या संबंधांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, क्रिकेट जसे भारताला कॅरिबियनशी जोडते तसे इतर कोणतेही माध्यम जोडत नाही. गयानाच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंशी एक आनंददायक संवाद साधला. या खेळाने दोन्ही राष्ट्रांना जवळ आणले आहे आणि आमचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले आहेत, असे पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर क्रिकेटचे दिग्गज खेळाडू क्लाईव्ह लॉईड म्हणाले की, आमची चांगली चर्चा झाली. संभाषण खूप चांगले झाले. मला वाटते की, आमचे 11 खेळाडू आता भारतात प्रशिक्षण घेतील. हे खूप चांगले झाले आहे. त्यांचा हा चांगला निर्णय आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांना क्रिकेटमध्ये रस आहे आणि ते क्रिकेटला चालना देण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला त्यांच्यासारखे आणखी पंतप्रधान निश्चितच आवडतील, असे लॉईड यांनी सांगितले.
माजी क्रिकेटपटू अल्विन कालीचरण या भेटीबाबत म्हणाले की, भारतातील प्रत्येकाला क्रिकेट माहित आहे. परंतु त्यांचे ज्ञान विशेष आहे. कारण आम्ही भारतात कधी गेलो होतो हे त्यांना माहीत आहे. ते आम्हाला आमच्या नावाने ओळखतात. भारतीय पंतप्रधानांना व्यक्तिश: भेटणे म्हणजे जादुई अनुभव आहे.