गुजरात तटावर अंमली पदार्थ जप्त
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या सागर तटावर वहात आलेली अंमली पदार्थांची 100 पाकिटे गेल्या काही दिवसांमध्ये जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती या राज्याच्या पोलिसांनी दिली आहे. काही पाकिटे देवभूमी द्वारका येथील सागरतटावर जप्त करण्यात आली. तर अन्य पाकिटे कच्छच्या तटावर ताब्यात घेण्यात आली आहेत.
या पाकिटांमध्ये चरस, हेरॉईन आदी प्रकारांचे अंमली पदार्थ आढळून आले आहेत. ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 100 पाकिटांपैकी 20 मध्ये चरस हे मादक द्रव्य आढळून आले. तर 9 पाकिटांमध्ये मेथँफेटामाईन हे रासायनिक मादक द्रव्य असल्याचे दिसून आले. जप्त केलेल्या मादक द्रव्यांचे एकंदर वजन 50 किलोहून अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही पाकिटे कोठून वहात आली, याचा शोध घेतला जात आहे. समुद्रात बुडालेल्या नौकेतून ती येथवर वहात आली असावीत असे प्राथमिक अनुमान आहे. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये अशी तस्करी केली जाते.