कुमामोटो बॅडमिंटन स्पर्धेत नाराओका विजेता
वृत्तसंस्था / कुमामोटो (जपान)
विश्व बॅडमिंटन फेडरेशन आयोजित येथे झालेल्या कुमामोटो मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या 10 व्या मानांकीत कोडाई नाराओकाने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या निशीमोटोचा पराभव केला. या स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद थायलंडच्या इंटेनॉनने पटकाविले.
2023 च्या नोव्हेंबरमध्ये चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद जिंकल्यानंतर दहाव्या मानांकीत नाराओकाचे बॅडमिंटन क्षेत्रातील हे पहिले विजेतेपद आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात नाराओकाने निशीमोटोचा 21-11, 10-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. या लढतीमध्ये नाराओकाने पहिल्या गेम 21-11 असा जिंकल्यानंतर निशीमोटोनो आपल्या डावपेचात बदल करत अचूक स्मॅश फटक्याच्या जोरावर दुसरा गेम 21-10 असा जिंकून नाराओकाशी बरोबरी केली. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये नाराओकाने दर्जेदार खेळ करत निशीमोटोचे आव्हान संपुष्टात आणले. कुमामोटो बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडचा टॉपसिडेड व्हिटीडेसम सहभागी होण्याचे निश्चित झाले होते. पण शेवटच्या क्षणी त्याने या स्पर्धेतून माघार घेतली.
या स्पर्धेत थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात इंटेनॉनने इंडोनेशियाच्या ग्रेगोरीया तूनजूंगचा 21-16, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. तृतिय मानांकीत इंटेनॉनचे चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामातील हे दुसरे विजेतेपद आहे. कुमामोटो स्पर्धेत थायलंडच्या पी. डिचेपॉल आणि पी. सुपीसेरा या जोडीने मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना फ्रान्सच्या थॉम दिग्वेल आणि डेलरुई यांचा 21-18, 14-21, 21-18 असा पराभव केला. द.कोरियाची टॉपसिडेड जोडी किम हो आणि सेओ जेई यांनी पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळविताना जपानच्या हिरोकी मिडोरीकेवा आणि येमासिता यांचा 20-22, 21-11, 21-16 असा पराभव केला. मलेशियाच्या पर्ली तेन आणि मुरलीधरन यांनी जपानच्या इवेनगा व नेकानिशी यांचा 22-20, 21-19 असा पराभव करत महिला दुहेरीचे एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.