कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात नरकचतुर्दशी-लक्ष्मीपूजन उत्साहात

10:06 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रांगोळ्यांनी अंगण -विद्युत रोषणाईने गावे उजळली : अभ्यंगस्नान-आरती ओवाळणी पारंपरिक पद्धतीने : मंगलमय दिवाळीने प्रफुल्लित वातावरण

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

तेजोमय प्रकाश देणाऱ्या, आनंदमय, मंगलमय दिवाळी सणाला तालुक्यात रविवारपासून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाही रविवारपासून या सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सणानिमित्त गावागावांमधील प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. सर्वत्र सामूहिक आरती, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये लक्ष्मी पूजन, शेतकऱ्यांची शिवारातील विशेष पूजा, नवीन विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी अशा आनंदाच्या धावपळीत ग्रामीण भागातील जनता रविवारी दिवसभर व्यस्त होती. गुरुवारी वसुबारस पूजनाने ग्रामीण भागात दिवाळी सणाच्या पर्वाला प्रारंभ झाला. या दिवशी शेतकऱ्यांनी गाई व वासराचे मनोभावे पूजा केली. दिवाळी सणानिमित्त सरकारी नोकरदार व खासगी कामगार वर्ग व्यावसायिक यांना सुटी असते. शेतकऱ्यांना मात्र दिवाळी सणांमध्ये सुटी नसते. कारण या दिवाळीच्या सणाच्या कालावधीतच ऐन सुगी हंगामाला सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे दिवाळी सणाची पूजाविधी शेतकरी पारंपरिक पद्धतीने करतात आणि शिवारामध्येही दिवसभर काम करताना दिसतात.

घरांसमोर आरती करून घेण्याची परंपरा कायम

रविवारी नरकचतुर्दशीनिमित्त सकाळी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सामूहिक पद्धतीने आरती करण्यात येत होत्या. गल्ली गल्लीमध्ये किंवा कुळ घराजवळ सर्व नागरिक एकत्र जमत होते. यावेळी महिला आरती करीत होत्या. आरती केल्यानंतर पायामध्ये कारीट ठेवण्यात आले होते. हे फोडून त्यातील कडू पदार्थ खाण्यात आला. माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टी येतात. त्यामुळे सुखाबरोबर कठीण प्रसंगांचा सामना करण्याचेही बळ मिळाले पाहिजे. त्यासाठीच कारीट हे कडू खाण्याची परंपरा आहे. ते आजही आरती केल्यानंतर पुरुष मंडळींनी खाऊन ही परंपरा जपली. ही आरती करताना पूजा करण्यात आली. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य सुख-समाधान ऐश्वर्या लाभू दे, अशी प्रार्थना देवाकडे उपस्थित सर्वांनी केली.

विविध वस्तूंची खरेदी

सध्या शिवारात सुगीचा हंगाम जोमाने सुरू आहे. त्यामुळे काही शेतकरी भात कापणी, भात बांधणे, रताळी काढणी आदी काम करीत होते. दिवाळीच्या सणानिमित्त नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी-चारचाकी वाहने याची खरेदी करण्यासाठीही ग्रामीण भागातील नागरिक बेळगावला गेले होते. भागातील नागरिकांनी या वस्तूंची खरेदीही जोमाने केली.

रांगोळ्या-गवळणमुळे सजले अंगण

दिवाळी सणानिमित्त घरासमोर काढण्यात आलेल्या रांगोळीवर शेणाने बनवलेली गवळण ठेवण्यात आली होती. घराच्या दरवाजासमोरही दोन गवळणी ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी महिलांनी आपल्या घरासमोर व चौकटीसमोर दिवे लावले होते. त्यामुळे ग्रामीण भागातही तेजोमय दिवाळीचे स्वरूप दिसून आले. काही ग्रामस्थांनी आपापल्या मंदिरांमध्ये रविवारी रात्री दीपोत्सव साजरा केला. यावेळी विविध मान्यवरांची दिवाळीच्या सणाची माहिती सांगणारी भाषणे झाली.प्रवचन व भजनाचे कार्यक्रम झाले.

विविध स्पर्धा-पोवाड्यांचे कार्यक्रम

बाहेरगावी कामानिमित्त गेलेले गावागावातील तरुण दिवाळी सणानिमित्त आपल्या गावी आले होते. आठवड्याभरात दिवाळी सणाच्या पाच सहा दिवसांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी पोवाड्यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. संगीत भजनी भारुड व इतर  कार्यक्रमही रविवारी रात्री झाले. दिवाळी सणानिमित्त सर्वजण आपापल्या मित्रमंडळी, पाहुण्यांना, हितचिंतक यांना मोबाईलच्या माध्यमातून व्हाट्स अॅप, फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

विविध दुकान-व्यावसायिकांकडून लक्ष्मीपूजन

ग्रामीण भागातील लघु उद्योजकांनी आपल्या कारखान्यांमध्ये, दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये लक्ष्मीपूजेचे आयोजन रविवारी सायंकाळी केले होते. हे पूजनही अगदी उत्साहात पार पडले. पुढील दोन दिवसही लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article