नंदगड मार्केटिंग सोसायटी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध
अध्यक्षपदी श्रीशैल माटोळी, उपाध्यक्षपदी चांगाप्पा बाचोळकर यांची निवड
वार्ताहर/नंदगड
नंदगड येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या दि. 12 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील पॅनेलने सर्वच 13 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवार दि. 23 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी श्रीशैल माटोळी (लिंगनमठ) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदासाठी चांगाप्पा बाचोळकर (इदलहोंड) यांचाही एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मार्केटिंग सोसायटीवर यापूर्वी फक्त अध्यक्षपदाची निवड करण्यात येत होती. या वर्षीपासून उपाध्यक्षपद निवडण्याचा नियम करण्यात आला आहे.
यावेळी मार्केटिंग सोसायटीचे संचालक अरविंद पाटील, महारुद्रय्या हिरेमठ, जितेंद्र मादार, दामोदर नाकाडी, जोतिबा भरमप्पनावर, प्रकाश गावडे, उदय पाटील, रफिक हलशीकर, निंगाप्पा तळवार, तेजस्विनी चंद्रशेखर होसमणी, पार्वती विठ्ठल पाटील आदींनी निवडणुकीत सहभाग दर्शवला होता. सोसायटीतर्फे मॅनेजर ज्ञानेश्वर निलजकर यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा शाल, श्रीफळ देऊन पुष्पहार घालून सत्कार केला. तर विविध संघ, संस्थांतर्फे आणि वैयक्तिकरित्याही सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनेल प्रमुख माजी आमदार अरविंद पाटील, नूतन अध्यक्ष श्रीशैल माटोळी, उपाध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांची अभिनंदन करणारी अनेकांची भाषणे झाली.
अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड
नंदगड मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष म्हणून श्रीशैल माटोळी यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी 10-11-2020 ते 22-11-2022 पर्यंत मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. गेल्या 15 वर्षापासून ते या मार्केटिंग सोसायटीवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच लिंगनमठ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे अध्यक्ष म्हणून गेली 25 वर्ष त्यांनी काम पाहिले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन मार्केटिंग सोसायटीचा विकास साधणार असल्याचे आश्वासन अध्यक्ष श्रीशैल माटोळी यांनी अध्यक्ष निवडीनंतर बोलताना दिले.
पहिल्याच प्रयत्नात मिळाली उपाध्यक्षपदाची संधी
नूतन उपाध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर हे पहिल्यांदाच मार्केटिंग सोसायटीवर संचालक म्हणून निवडून आले होते. पहिल्याच वेळी त्यांना उपाध्यक्ष मिळाले आहे. ते इदलहोंड विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. वरील निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.