नंदगड-बेळगाव बससेवा अचानकपणे बंद
विद्यार्थी-प्रवाशांची गैरसोय
वार्ताहर/नंदगड
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली नंदगड-बेळगाव बससेवा अचानकपणे बंद केल्याने विद्यार्थीवर्गाची गैरसोय होत आहे. आठवड्याभरात या बससेवेला सुरुवात न झाल्यास विद्यार्थी व प्रवाशांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कसबा नंदगड ग्रा. पं. माजी चेअरमन प्रवीण पाटील यांनी दिला आहे. नंदगड-बेळगाव बससेवा सुरू करावी म्हणून कित्येक महिन्यापासून मागणी करण्यात आली होती. यासाठी कसबा नंदगड ग्रा.पं. माजी चेअरमन प्रवीण पाटील यांनी वारंवार खानापूर आगारप्रमुखांना निवेदन दिले होते. त्यानुसार 22 डिसेंबर 2023 रोजी या बससेवेला सुरुवात झाली होती.
खानापूर आगाराची बस सकाळी 9 वा. नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळ्यापासून सुरू होऊन खानापूरमार्गे बेळगावला जात होती. या बससेवेला संगोळ्ळी रायण्णा एक्सप्रेस असेही या भागातील जनतेने, विद्यार्थ्यांनी नाव दिले होते. दरम्यानच्या काळात बसमध्ये मुबलक प्रवासी व विद्यार्थी उपलब्ध असताना अचानकपणे बसफेरी बंद केली आहे. त्यामुळे नंदगडहून खानापूर व बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थीवर्गांची गैरसोय होत आहे. संगोळ्ळी रायण्ण्णा समाधीस्थळी येणाऱ्या पर्यटकांचीही आता बसफेरी बंद झाल्याने जवळच्या बसथांब्यावर थांबून दुसऱ्या बससेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.