न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिकेचे नामकरण
मार्टिन क्रो-ग्रॅहम थॉर्प ट्रॉफी
वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेचे आता नामकरण करण्यात आले आहे. भविष्य काळात उभय संघातील कसोटी मालिकेला मार्टिन क्रो आणि ग्रॅहम थॉर्प चषक मालिका म्हणून ओळखली जाईल.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो आणि इंग्लंडचे माजी कसोटीवीर ग्रॅहॅम थॉर्प यांच्या नावांचा चषक या कसोटी मालिकेसाठी ठेवला जाईल. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अॅशेस मालिका तसेच बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका याच धर्तीवर आता मार्टिन क्रो आणि ग्रॅहॅम थॉर्प चषक कसोटी मालिका म्हणून ओळखली जाईल. न्यूझीलंडच्या मार्टिन क्रोने आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 17 कसोटी शतके झळकविताना फलंदाजीत 45.36 धावांची सरासरी राखली आहे. तर इंग्लंडच्या ग्रॅहॅम थॉर्पने आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटीत 16 शतके 44.66 धावांच्या सरासरीने नोंदविली आहेत. कसोटी क्रिकेट क्षेत्रातील या दोन महान खेळाडूंची आठवण नव्या पिढीमध्ये राहण्यासाठी उभय संघातील कसोटी मालिकेला आता क्रो-थॉर्प चषक म्हणून ओळखले जाईल, अशी माहिती न्यूझीलंडचे सीईओ स्कॉट विनिंक यांनी दिली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी ख्राईस्टचर्च येथे होणार असून या कसोटी सामन्यावेळी या नव्या चषकाचे अनावरण मार्टिन क्रोची बहीण डेबी तसेच इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथरटन यांच्या हस्ते केले जाणार आहे.