नामिबियाचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
विंडहॉक (नामिबिया)
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या टी-20 मालिकेतील सामन्यात यजमान नामिबियाने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर ऐतिहासिक पराभव केला. नामिबियाने हा सामना 4 गड्यांनी जिंकला. आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघावर नामिबियाचा हा पहिलाच मोठा विजय म्हणावा लागेल.
या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी लढत दिली. पण त्यांना अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर नामिबियाने 20 षटकात 6 बाद 138 धावांपर्यंत मजल मारत शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला. नामिबिया संघाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेबरोबर क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत असल्याने नामिबियातील या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दुय्यम दर्जाचा संघ पाठविण्यात आला होता. द. आफ्रिकेचे नेतृत्व डोनोव्हेन फरेराकडे सोपविण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये जेसन स्मिथने सर्वाधिक म्हणजे 31 चेंडूत 30 धावा जमविल्या. नामिबियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची स्थिती 5 बाद 68 अशी केविलवाणी झालेली होती. अनुभवी डिकॉक आणि हेंड्रीक्स हे लवकर बाद झाले. नामिबियातर्फे 27 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पलेमनने 28 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नामिबियाची स्थिती 4 बाद 66 अशी होती. त्यानंतर नामिबियाचा अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज ग्रीनने 23 चेंडूत नाबाद 30 धावा जमविल्या. तर रुबेन ट्रम्पलेमनने 8 चेंडूत 11 धावा केल्या. नामिबियाचा कर्णधार इरासमूसने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेतर्फे बर्गरने 21 धावांत 2 तर सिमलेनीने 28 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका 20 षटकात 8 बाद 134 (जेसन स्मिथ 31, ट्रम्पलेमन 3-28), नामिबिया 20 षटकात 6 बाद 138 (ग्रीन नाबाद 30, ट्रम्पलेमन 11, बर्गर 2-21, सिमलेनी 2-28).