नामीबियाचे अध्यक्ष हेज गिंगोब यांचे कर्करोगामुळे निधन
वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ विंडहोक
नामीबियाचे अध्यक्ष हेज गिंगोब यांचे रविवारी पहाटे निधन झाले आहे. विंडहोक येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे नामीबियाच्या अध्यक्षीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात नमूद आहे. मृत्यूसमयी गिंगोब हे 82 वर्षे वयाचे होते. नामीबियाचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले गिंगोब यांनी मागील महिन्यात आपण कर्करोगाने पीडित असल्याचा खुलासा केला होता.
हेज गिंगोब यांच्या पत्नीचे नाव मोनिका गिंगोस असून त्यांना तीन अपत्य आहेत. मागील महिन्यात हेज गिंगोब यांच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान बायोप्सीमध्ये कॅन्सर पेशींचे निदान झले होते. गिंगोब यांनी पंतप्रधान म्हणून नामीबियात सर्वाधिक काळापर्यंत सेवा बजावली आहे. 2013 मध्ये त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. मागील वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत एऑर्टिकची शस्त्रक्रिया करविली होती. तर मागील काही काळापासून विंडहोक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गिंगोब हे ओवाम्बो वांशिक समुदायाशी संबंधित होते, या समुदायाच्या लोकांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.